मुंबई : मुंबईत शुक्रवारपासून विविध ठिकाणी आगी लागण्याच्या घटना सुरूच आहेत. शुक्रवारी अंधेरी, सायन येथे आगीच्या घटना घडलेल्या असतांना दुसऱ्या दिवशी अर्थात आज (शनिवार) दुपारच्या सुमारास गोरेगाव (पश्चिम) कल्पतरू रेसिडेन्सी या ३२ मजली इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणी जखमी झाले नाही. मात्र प्रसंगावधान राखून या रहिवाशी इमारतीमधील अनेक रहिवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीबाहेर काढण्यात आल्याने ते थोडक्यात बचावले.
गोरेगाव (पश्चिम), सिद्धार्थ नगर, प्रबोधन उद्यानानजिक असलेल्या तळापासून ३२ मजली कल्पतरू या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर आज (शनिवार) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग का व कशी लागली याबाबतचे कारण समजू शकले नाही. या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनस्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.
आगीची माहिती समजताच इमारतीमध्ये एकच धावपळ सुरू झाली. अनेक रहिवाशांनी सुरक्षिततेसाठी इमारतीबाहेर धाव घेतली. तर, अनेक लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी इमारतीच्या बाहेर सुखरूपपणे बाहेर काढल्याने ते थोडक्यात बचावले. या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, केबल, उपकरणे आदी सामान जळाले. आगीचे स्वरूप पाहता अग्निशमन दलाने काही अवधीत आग स्तर – १ ची असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, अग्निशमन दलाने आगीची घटना घडल्याने आणि इमारतीमध्ये आगीचा धूर पसरल्याने लिफ्ट बंद केली. तसेच, जिन्याच्या सहाय्याने रहिवाशांची आगीतून सुटका केली. तसेच, जिन्याच्या मार्गानेच आग विझविण्याचे कार्य हाती घेतले. मात्र या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस आग का व कशी लागली, याबाबत अधिक तपास करीत असल्याचे सांगण्यात येते.
