महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा कदम यांचा अप्रत्यक्ष टोला; शहर पश्चिम भागामध्ये वाढता संपर्क दौरा
सातारा : सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी महाविकास आघाडीने सामूहिकरित्या मला उमेदवारी दिली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे, मात्र माझ्या पक्षांतरावर बोलणारे नैतिकतेची भाषा करतात. त्या अनुषंगाने मात्र त्यांचे पक्षांतर हे ठेकेदारांसाठी आहे का? अशी अप्रत्यक्ष टीका महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार अमितदादा कदम यांनी कोणाचेही नाव न घेता साताऱ्यात केली.
मंगळवार पेठ, बोगदा, समर्थ मंदिर परिसर तसेच शहराच्या पश्चिम भागात अमितदादा कदम यांचा मतदारांशी संवाद दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
अमितदादा कदम पुढे म्हणाले, विद्यमान आमदारांना आम्ही वेळोवेळी मदत केली आहे. त्यांना आम्ही मतदान केले त्याची नोंद झाली नाही का? कुठलाही निर्णय होताना वैयक्तिक स्वरूपाचा होत नसतो, तो सामूहिक स्वरूपाचा निर्णय असतो. सातारा-जावली मतदार संघांमध्ये माझी उमेदवारी ही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झालेली आहे. ज्यावेळी एखादा सामूहिक निर्णय होतो, त्यावेळी सर्व घटक त्या सामूहिक निर्णयाचा आदर करून एकमेकांना सहकार्य करतात. आम्ही सुद्धा त्यांना बऱ्याच वेळा सहकार्य केले आहे. मात्र ती बाजू लक्षात घेतली जात नाही. पक्ष बदलाच्या संदर्भात नैतिकतेने बोलणारे स्वतः किती वेळा, कोण कोणत्या पक्षात गेले, हे त्यांनी सांगावे. त्यांचे हे पक्ष बदल ठेकेदारांच्या फायद्यासाठी आहेत का? असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला.
जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या नाराजी संदर्भातही विचारले असता, ते म्हणाले, साहजिकच आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेल्या दोन-अडीच वर्षात त्यांनी शिवसेना जिल्ह्यात उभी केली आहे. वेगवेगळ्या प्रश्नांवर शिवसेना लढत आहे. त्यांची नाराजी असणे स्वाभाविक आहे. मात्र आम्ही एकमेकांच्या सहकार्याने पुढे जात आहोत. शिवसेना अखंड आहे. आमच्यात मतभेद असतील पण मनभेद नाहीत.
खासदार उदयनराजे भोसले समर्थक वसंत लेवे यांच्याशी काही राजकीय चर्चा झाली का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, लेवे आणि आमचे जुने संबंध आहेत. साताऱ्याच्या विविध प्रश्नावर आम्ही चर्चा केली आहे. हे संबंध व्यक्तिगत व स्नेहपूर्ण आहेत. राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन वेगळी भूमिका मांडली आहे. या संदर्भात बोलताना अमितदादा कदम म्हणाले, महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांना सहकार्य करत असून, आमच्यामध्ये उत्तम समन्वय आहे. दीपक पवार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. त्यामुळे योग्य चर्चा करून त्यांची नाराजी दूर केली जाईल. महाविकास आघाडीच्या प्रचार यंत्रणेमध्ये कोठेही मतभेद आढळणार नाहीत. आम्ही सर्व एकत्र होऊन नेटाने ही लढाई कशी जिंकायची यासाठी प्रयत्न होत आहेत. शिवसैनिक हा आदेशाला मानतो, सातारा-जावली या दोन तालुक्यांमध्ये शिवसेनेचे उत्तम नेटवर्क आहे. शिवसैनिक निश्चितच आपली ताकद दाखवतील, यात मला शंका नाही असा विश्वास अमितदादा कदम यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, सागर रायते, सुनील पवार, शिवराज टोणपे, सादिक बागवान, प्रणव सावंत, इम्रान बागवान, आरिफ शेख, हरि पवार, रवींद्र भणगे, इत्यादी उपस्थित होते.
साताऱ्यात अमितदादा कदम यांची समर्थ मंदिर, बोगदा परिसर, मनामती चौक, ढोल्या गणपती परिसर, मंगळवार पेठ, राजवाडा तसेच रामाचा गोट परिसरात रॅली झाली, या जनसंवाद यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाला.
