पुण्यातील नेत्याचाही समावेश
पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचारासाठी अवघा एक आठवडा बाकी राहिल्यामुळे जोरदार तयारी केली जात आहे. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे यंदाची निवडणूक जोरदार गाजत आहे. सर्व राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. पहिल्यांदाच महायुती व महाविकास आघाडी हे तीन पक्ष एकत्रित करुन निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे अनेक नेत्यांच्या इच्छांवर पाणी फिरले. तसेच बंडखोरी देखील वाढली. कॉंग्रेस पक्षाने पक्षातील या बंडखोर नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
तीन पक्ष मिळून एकत्रितपणे निवडणुकीला समोरे जात असल्यामुळे मतदारसंघ हे युतीमध्ये विभागले गेले आहेत. त्यामुळे राज्यामध्ये नाराजीनाट्य सुरु असून बंडखोरी वाढली आहे. काही मतदारसंघामध्ये महायुती व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असताना देखील मित्रपक्षातील उमेदवार दिले आहेत. तर काही मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. अनेक मतदारसंघामध्ये नेत्यांनी बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख (दि.04) होऊन गेली आहे. तरी देखील अर्ज मागे न घेतल्यामुळे कॉग्रेस पक्षाने बंडखोर नेत्यांवर कारवाई केली आहे.
कॉंग्रेस पक्षाने पाच बंडखोर नेत्यांवर कारवाई केली आहे. पक्षश्रेष्ठींकडून ही कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये बंड करणाऱ्या पाच नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई थोड्या नाही तर तब्बल सहा वर्षांसाठी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे. यामध्ये, राजेंद्र मुळीक, कमल व्यवहारे, जयश्री पाटील, याज्ञवल्क्य जिचकरजिचकर आणि आबा बागुल यांचा समावेश आहे. आबा बागुल हे पुण्यातील कॉंग्रेस नेते असून त्यांच्यावर निलंबानाची कारवाई करण्यात आली आहे.
पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाला आला. शरदचंद्र पवार पक्षाकडून अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली. तर महायुतीकडून भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. पण यामुळे नाराजस झालेल्या काँग्रेसचे नेते आबा बागुल यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी आबा बागुल प्रयत्नशील होते. पण, पर्वतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अश्विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आबा बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज शेवटच्या क्षणापर्यंत बागुल निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अर्ज मागे न घेता त्यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. आता पर्वतीत तिरंगी लढत होणार आहे. यामुळे महाविकास आघाडीला फटका तर महायुतीला फायदा होणार आहे. यामुळे कॉंग्रेसकडून आबा बागुल यांच्यावर तब्बल 6 वर्षांची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
