Explore

Search

April 13, 2025 10:35 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Political News : शरद पवारांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला दाखवला ‘ठेंगा’

हिंगोली :  नांदेड उत्तर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या मतदारसंघात काँग्रेससह उद्धव ठाकरे यांनीही उमेदवार उतरवल्यामुळे मविआचा उमेदवार कोण असा प्रश्न अनेकांना पडला. त्यात वसमत येथे शरद पवारांची जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवारांनी नांदेड उत्तरच्या उमेदवार म्हणून संगीता पाटील यांच्या नावाचा उल्लेख केला. संगीता पाटील या नांदेड उत्तर मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत. मात्र सभा संपल्यानंतर शरद पवारांना ही चूक लक्षात आली तेव्हा त्यांनी तात्काळ पत्रकारांसमोर या चुकीची सुधारणा केली.

वसमतच्या जाहीरसभेत शरद पवारांनी संगीता पाटील डक यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यानंतर पत्रकारांनी नांदेड उत्तरमध्ये महाविकास आघाडीचे २ उमेदवार आहेत. नेमकं मविआचा उमेदवार कोण असा प्रश्न शरद पवारांना केला. त्यावर शरद पवार म्हणाले की, मी उमेदवारांची नावे काय हे विचारले होते, माझ्याकडे काहींनी लिखित नावे दिली. ती नावे मी वाचून दाखवली. त्यानंतर माझ्या लक्षात आले की नांदेड उत्तरला आम्हा सर्वांचे उमेदवार अब्दुल सत्तार आहेत. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची निशाणी पंजा आहे. आमचे समर्थन, पाठिंबा अब्दुल सत्तार यांच्यासाठीच आहे, अन्य कुणाला नाही अशी सुधारणा शरद पवारांनी केली.

नांदेड उत्तरमध्ये पेच काय?

नांदेड जिल्ह्यातील एकूण ९ पैकी ७ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार दिले आहेत. त्यात नांदेड उत्तर मतदारसंघातून अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिली तर याच मतदारसंघात ठाकरे गटाने संगीता पाटील डक यांना एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. नांदेड उत्तरचा दावा ठाकरे गट सोडण्यास तयार नव्हते. परंतु मविआच्या वाटाघाटीत ही जागा काँग्रेसला सुटली. विशेष म्हणजे ठाकरे गटाने या मतदारसंघात इतर पक्षातून आलेल्या संगीता डक यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्येही नाराजी पसरली आहे.

दरम्यान, संगीता पाटील डक यांच्या उमेदवारीवरून ठाकरे गटात २ मतप्रवाह आहेत. त्यात माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी पैसे घेऊन ही उमेदवारी देण्यात आली असा आरोप पक्षनेतृत्वावरच लावला. त्यामुळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे. तर दुसरीकडे पक्षाच्या आदेशाचे काम करत काही शिवसैनिकांनी संगीता पाटील डक यांचा प्रचार सुरू केला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संगीता डक आपल्या उमेदवार असल्याची सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळे ठाकरे गटातील काही पदाधिकारी अब्दुल सत्तार आणि काही पदाधिकारी संगीता डक यांचा प्रचार करत आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy