संतोष कटके घेणार उद्धव ठाकरेंची भेट!
मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगली रंगली आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारादरम्यान, राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. एखादा नेता आक्षेपार्ह विधान करून नंतर गदारोळ झाल्यामुळे माफी मागतोय, तर एखाद्या नेत्याच्या भर सभेत गोंधळ झालेला पाहायला मिळतोय. काल (11 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यालाच शिवसैनिक संतोष कटके यांनी आडवले होते. या तरुणाच्या या कृत्यामुळे खुद्द एकनाथ शिंदे यांना गाडीच्या खाली उतरावे लागले होते. दरम्यान, आता हाच तरुण आज (12 नोव्हेंबर) थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संतोष कटके यांचे वडील आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
संतोष कटके यांनी ताफा अडवला
संतोष कटके या शिवसैनिकाचे वडील साधू कटके हे आरपीआय (आठवले गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. संतोष कटके यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा ताफा आडवल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल साकीनाका एक जाहीर सभा झाली. ही सभा संपल्यानंतर मुख्यमंत्री तेथून निघाले. मात्र काही अंतरावरच शिंदे यांचा ताफा संतोष कटके यांनी अडवला. या वेळी अपशब्दही बोलल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गाडीतून थेट खाली उतरावे लागले होते. या प्रकारानंतर पोलिसांनी संतोष कटके यांना ताब्यात घेतलं होतं.
संतोष कटके उद्धव ठाकरेंच्या भेटीला
ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी दंड भरायला लावून त्याला रात्रीच सोडून दिले होते. संतोष कटके याचे वडील साधू कटके हे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ते आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष आहेत. कालच्या घटनेनंतर संतोष कटके यांनी आज थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संतोष कटके यांच्या या कृतीनंतर आता साधू कटके यांनीदेखील आरपीआयची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या साठी ते आणि संतोष कटके मातोश्री वर दाखल झाले आहेत.
साकीनाकामध्ये काय घडलं होतं?
मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांची साकीनाका येथे एक सभा होती. ही सभा संपल्यानंतर एकनाथ शिंदे 90 फुटी रस्त्यावरून त्यांच्या ताफ्यात जात होते. याच रस्त्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार नसीम खान यांचे कार्यालय आहे. शिंदे यांचा ताफा नसीम खान यांच्या कार्यालयापुढे आला होता. यावेळीच काही लोकांनी शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. त्यानंतर संतोष कटके नावाचा तरुण पुढे आला. त्याने मुख्यमंत्र्यांचा ताफा आडवला.
