मुंबई : महाविकास आघाडीने रविवारी आपला जाहीरनामा प्रकाशित केला. 2030 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 400 वी जयंती आहे. त्यामुळे 2030 पर्यंत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याचे, समृद्ध महाराष्ट्र निर्मितीचे ध्येय महाविकास आघाडीने निश्चित केले आहे! महाविकास आघाडीने सत्तेत आल्यावर पहिल्या 100 दिवसांत करावयाची कामे आणि 2030 पर्यंत करावयाची कामे अशा दोन भागांत जनतेसमोर आपला जाहीरनामा सादर केला आहे! लाडकी बहीण योजनेला महाविकास आघाडी राजकीय प्रत्युत्तर कशी देणार, याबाबत उत्सुकता असताना महाविकास आघाडीने सत्तेत आल्यास दरमहा तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.
तसेच महिलांना मोफत बस प्रवासाची घोषणाही केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्रात 2 कोटी 40 लाख महिलांनी नोंद केली आहे. त्यांना लाभ मिळाला आहे. हे लाभार्थी मतदारही आहेत. त्यामुळे महिन्याला तीन हजार रुपयांचे आश्वासन हे या जवळपास अडीच कोटी महिलांना प्रभावित करणारे आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पाहता या योजना नवा आर्थिक भार वाढविणार्या ठरल्या! स्वतंत्र बाल कल्याण मंत्रालय आणि कोरडवाहू शेतीसाठी स्वतंत्र संचालनालय या वेगळ्या महत्त्वाच्या घोषणा आहेत.
वीज युनिट अन् तीन लाखांपर्यंत कर्जमाफी
महाविकास आघाडीने मात्र तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा शब्द दिला आहे. 300 युनिटपर्यंत वीज वापर असणार्या वीज ग्राहकांना 100 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करण्याचे आश्वासन महाविकास आघाडीने दिले आहे. राज्यातील जवळपास सर्व घरगुती वीज ग्राहक 300 युनिटच्या आत वीज वापर करतात. त्यांना या सवलतींचा लाभ मिळेल. जातनिहाय गणना आणि आरक्षणाची 50 टक्के मर्यादा हटवण्याच्या आश्वासनाचा मोठा परिणाम होईल. बेरोजगार तरुणांना दरमहिन्याला 4 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणाही तरुणाईला आकर्षित करणारी आहे.
