शरद पवारांचा हल्लाबोल
नाशिक : शरद पवार हे आज नाशिक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. एकाच दिवसात पवारांच्या पाच सभा होणार आहेत. कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात माकपचे उमेदवार जे. पी. गावित यांच्या प्रचारासाठी आज शरद पवारांनी सभा घेतली. या सभेतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. देशात महाराष्ट्र एक नंबरचे राज्य म्हणून लौकिक होता, तो या राज्यकर्त्यांनी घालवला त्यासाठी आपण आता काम केले पाहिजे. सत्येत आल्यावर आदिवासी, शेतकरी, महिला सुरक्षा यासाठी काम करू, त्यासाठी कॉम्रेड गावीत यांना निवडून द्या असे आवाहन पवारांनी केलं.
शरद पवार म्हणाले की, आजची सभा ऐतिहासिक सभा आहे. कानाकोपऱ्यातून सभेसाठी लोक आलेत मी सर्वांचे अंतःकरणापासून स्वागत करतो. लोकसभा निवडणुक झाली त्यात तुम्ही महाविकास आघाडीला निवडून दिले. देशाचे पंतप्रधान 400 जागा निवडून द्या, अशी मागणी जागोजागी करत होते. 50 टक्क्यांपेक्षा कमी खासदार असतानाही काही सरकार टिकले, पण यांना 400 जागा कशासाठी हव्या होत्या? खोलात गेल्यावर कळलं की यांचा वेगळा डाव होता. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले त्यात बदल करण्यासाठी 400 खासदार यांना हवे होते. आम्हाला शंका आली म्हणून आम्ही सर्व एकत्र आलो आणि आम्ही इंडिया आघाडी स्थापन केली. देशातील लोकांना सांगितलं की 400 जागा दिल्या तर संविधानाला धक्का लागेल. मला आनंद आहे, सगळ्यांनी धोका ओळखला आणि आकडा ओलांडू दिला नाही. नितीशकुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी साथ दिली आणि सरकार आले.
ते सांगतात आम्हाला संविधान बदलायचे नव्हते, पण ते खोटे आहे. त्यांचे खासदार, नेते सांगत होते की मोदी साहेबांना घटना बदलायची होती. पण बाबासाहेबांची घटना जतन करण्याचे काम तुम्ही केले.
लाडकी बहिणवरुन साधला निशाणा
यावेळी लाडकी बहिण योजनेवरुनही त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. लाडकी बहीण योजना आणली. या बहिणीला मदत करा. पण, तिच्या संरक्षणाची जबाबदारी घ्या. एका शाळेत लहान मुलीवर अत्याचार केले. 20 वर्ष ज्या मुलींचा शोध लागत नाही अशा मुलींची संख्या 680 आहेत. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना भगिनींचे संरक्षण करता येत नाही, त्यामुळे भगिनींच्या संरक्षणासाठी आम्ही काम करणार आहोत.
शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. या राज्यात, देशात जे जंगल वाचले ते आदिवासींमुळे वाचले आहे. जंगल राखण्याचे काम आदिवासी करत आहेत. हा आदिवासी कष्ट करणारा, शेती करणारा आहे, मग हा वनवासी शब्द आला कुठून? जे पी गावित यांनी व्यक्तिगत कामे कधी मांडले नाही, आदिवासी शेतकऱ्यांचे कामे सांगितले आहेत. इथून लाल झेंडा घेऊन मोर्चा काढला. त्या मोर्चाची देशाने दखल घेतली होती. त्याचे नेतृत्व जे पी गावीत यांनी केलं असे शरद पवार यांनी म्हटले.
शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्याच्या कामात भ्रष्टाचार
शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. त्याच्या उद्घाटनाला मी आलो होतो. त्या पुतळ्याचे काम अजुनही सुरू आहे. शिवाजी महाराज दैवत आहे, युग पुरुष आहेत. या निवडणुकीनंतर प्रमुख लोकांनी बसावे आणि काम पूर्ण करावे. राज्यकर्त्यांना शिवाजी महाराजांची आस्था किती याबाबत शंका वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुदुर्गमध्ये पुतळा उभारला आणि तो कोसळला. मुंबईमध्ये 1960 साली पुतळा उभारला. पण, इतक्या वर्षात धक्का बसलेला नाही, अखंड वारं असतानाही धक्का बसला नाही. नरेंद्र मोदी आल्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कसा पडतो ? पुतळ्यात भ्रष्टाचार केला हे या सरकारचे वैशिष्ट्य असल्याची टीका पवारांनी केली.
