Explore

Search

April 17, 2025 6:00 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Political News : पुतळ्यात भ्रष्टाचार करणार्‍यांवर विश्वास कसा ठेवायचा?

शरद पवार यांचा सवाल

पुणे : सिंधदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात भाजपने भ्रष्टाचार केला. जे छत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करायला थांबत नाहीत, ते सामान्य लोकांसाठी काम करतील? यावर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुतीला केला.

खडकवासला मतदारसंघातील धनकवडीत प्रचार सभेत शरद पवार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अंकुश काकडे, माजी आमदार कुमार गोसावी, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विशाल तांबे, बाळा धनकवडे, काका चव्हाण यावेळी उपस्थित होते.

या वेळी पवार म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती श्रीशिवाजी महाराजांनी एक किल्ला उभा केला, तो गेले अनेक वर्षे समुद्रात टिकला आहे, त्याला कधीही धक्का बसला नाही. त्या किल्ल्याच्या जवळ भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. त्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पण तो अवघ्या 8 महिन्यांत कोसळला. वार्‍याने पुतळा कोसळ्याचे सांगण्यात आले. इंडिया गेट भागात 1960 साली यशवंतराव चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला पण त्याला आजपर्यंत धक्कासुद्धा लागलेला नाही.

मग सिंधुदुर्ग येथीलच पुतळा का पडतो? यावरून पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होते. जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करण्यास थांबत नाहीत, ते महाराष्ट्रातील सामान्य लोकांनी यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असेही पवार यांनी सांगितले.

दोन वर्षांत राज्यात 67 हजार 381 महिलांवर अत्याचार झाल्याची नोंद आहे, याचा अर्थ राज्यात दर तासाला पाच महिलांवर अत्याचार होतो. राज्यातील 64 हजार महिला बेपत्ता आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात तेरा हजार मुली आणि महिला बेपत्ता आहेत.

एका बाजूला लाडकी बहीण आणि दुसर्‍या बाजूला महिलांवर अत्याचार होत आहेत, त्याकडे ढुंकूनही बघायचे नाही. सहा महिन्यांत एक हजार 267 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. खते, बियाणे, औषधांच्या किमती वाढत आहेत, खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. ही राज्याची सद्यःस्थिती आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy