पुणे : वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांची सभा आयोजित केली होती. तेव्हा जयंत पाटील यांनी राज्यात गाजलेल्या पोरशे अपघातप्रकरणातील त्या दोन युवक-युवतींना श्रद्धांजली वाहून सर्वांचीच मने जिंकली. त्यांचा सत्कार केला जात असताना पाटील म्हणाले, “माझं काय म्हणणं आहे, सत्कार वगैरे नको, त्या पोर्शे कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांना श्रद्धांजली वाहूयात, सत्कार बंद करा” असे म्हणत प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांनी एक आदर्श देखील घालून दिला.
जयंत पाटील यांची शुक्रवारी बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ धानोरी परिसरात जाहीर सभा होती. जाहीर सभेतच हा संपूर्ण प्रकार घडला. पोर्शे अपघात प्रकरणातील बळींना श्रध्दांजली वाहण्यासाठी जयंत पाटील यांनी स्वतःचा सत्कार बाजूला ठेवला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते. या सभेत जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा पोर्शें अपघात प्रकरणावरून आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. एखादा आमदार गरिबासाठी राबला तर त्याचे कौतुक होते. मात्र इथले आमदार श्रीमंतांच्या मुलाचे सुचली पुरवण्यासाठी रात्रभर नोकरासारखे दाबले असे म्हणत त्यांनी पोर्शें प्रकरणावरून आमदार टिंगरे यांच्यावर निशाणा साधला.
आपल्या घणाघाती भाषणात जयंत पाटील म्हणाले, “विकास करणारा आमदार हवा की विनाश करणारा आमदार हवा, हे तुम्ही राज्याला दाखवून दिले पाहिजे. बापूसाहेब पठारे हे एक कर्तबगार उमेदवार आहेत. त्यांनी वडगावशेरीतील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. त्यांच्या रुपाने वडगावशेरीत विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असा दमदार उमेदवार विधानसभेत गेला पाहिजे.”
बापू पठारे विरुद्ध सुनिल टिंगरे लढत
कल्याणीनगर येथे मे महिन्यात झालेल्या ‘पोर्श कार’ अपघात प्रकरणामुळे चर्चेत आलेले राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर विश्वास दाखवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वडगाव शेरीमधून उमेदवारी दिली आहे. तर, भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार बापू पठारे यांना आमदार टिंगरे यांच्याविरोधात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात होणारी लढत माजी विरुद्ध विद्यमान आमदार अशी होणार आहे.
