छुप्या प्रचारावर करडी नजर
पुणे : पदयात्रा, गाठीभेटी, कोपरा सभा आणि जाहीर सभांमधून केलेली आश्वासनांची खैरात, आरोप प्रत्यारोपांचे सोडलेले शाब्दीक बाण आणि टीकेला प्रतिउत्तराने दिलेल्या जबाबामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीदरम्यानचा शेवटच्या रविवारच्या सुट्टीचे निमित्त साधून उमेदवारांसह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला. त्यामुळे रविवारचा दिवस हा प्रचाराचा सुपरसंडे ठरला.!विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी पाच वाजता संपणार आहे.
प्रचाराच्या तोफा आज, सोमवारी थंडावणार आहेत. त्यानंतर गुप्त बैठका, राजकीय डावपेच रंगतील. मतदानापूर्वीचे ४८ तास महत्त्वाचे असल्याने राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हालचालींवर निवडणूक पथकांचा करडी नजर राहणार आहे. पाच नोव्हेंबरपासून निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी जाहीर प्रचाराला सुरुवात केली. राजकीय नेत्यांच्या सभा, बैठका, प्रचार फेऱ्या यामुळे निवडणूक प्रचाराला चांगलीच रंगत आली. आरोप-प्रत्यारोपामुळेही ऐन थंडीत राजकीय वातावरण गरम झाले आहे. सुमारे १३ दिवसांच्या प्रचारानंतर आज, सोमवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. जाहीर प्रचार बंद होणार असला, तरी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन प्रचार करण्यात येतो. गुप्त बैठकांचे सत्रहो याच काळात सुरू होते. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वीचे दोन दिवस महत्त्वाचे आहेत. निवडणूक विभाग, पोलिस यंत्रणा यांची स्थिर आणि फिरती पथके अधिक सक्रिय राहणार आहेत. उमेदवार, राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हालचालीवरही त्यांची नजर राहणार आहे. महायुती, महाविकास आघाडी, मनसे, तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसह कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा शेवटच्या रविवारच्या दिवशी मतदारसंघ पिंजून काढला.
पदयात्रा, रॅली, कोपरा सभा घेण्यात आल्या. मतदारसंघातील प्रमुख व्यक्तींच्या गाठीभेटी घेत, ‘तुमची मते आम्हालाच,’ असा वादाही अनेक उमेदवारांनी मतदारराजाकडून घेतला. मतदारराजा सुट्टीमुळे घरीच असल्याने अनेक कार्यकर्त्यांसह उमेदवारांनी थेट घरोघरी जाऊन पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला. मतदारराजाला विविध आश्वासने देत, ‘योजना सुरू ठेवायच्या असतील तर महायुतीचे सरकार हवे’, असे सांगत मतांचा जोगवा मागण्यात आला.
