पुणे शहरातील आठही उमेदवारांनी प्रचाराची सांगता केली. तसेच पत्रकार परीषदेत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी आपल्या जागा जास्त निवडुन येतील असा दावा केला आहे.
पुणे : वाहन रॅलीच्या माध्यमातून संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढत शहरातील आठही उमेदवारांनी प्रचाराची सांगता केली. तसेच पत्रकार परीषदेत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी आपल्या जागा जास्त निवडुन येतील असा दावा केला आहे. पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जाेरदार प्रचार केला गेला. महाविकास आघाडी, महायुती यांच्यातच प्रमुख मतदारसंघात लढत हाेणार आहे. तर काही ठिकाणी मनसेमुळे लढत तिरंगी हाेण्याची चिन्हे आहेत. अपक्ष आणि बंडखाेर उमेदवारांनी देखील जाेरदार प्रचार करून पक्षाच्या उमेदवारांना घाम फाेडला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुण्यात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची सभा पार पडली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सभा पार पडल्या.
तसेच उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, उत्तराखंड आदी राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या प्रचारात सहभाग घेतला. पुण्यातील विविध मतदारसंघात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेत रंगत भरली. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डाॅ. अमाेल काेल्हे , संजय राऊत , बाळासाहेब थाेरात, आदी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभा घेऊन प्रचारात धुराळा उडविला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा मात्र, पुण्यात झाली नाही. गेल्या दाेन आठवड्यापासून सुरु असलेल्या प्रचाराची साेमवारी सांगता झाली. साेमवारी काॅंग्रेसकडून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, अंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आमदार वीनेश फाेगाट यांनी सहभाग घेतला. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सहभाग घेतला.
रॅलींमुळे वाहतुक काेंडीत भर
शहराच्या बहुतेक भागात उमेदवारांकडून वाहन रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले गेलेे. हलगी, ढाेली बाजा वाजवित, पक्षाचे आणि चिन्हाचे झेंडे नाचवित, तसेच उमेदवाराच्या नावाचा जयघाेष करणारे कार्यकर्ते असे चित्र या रॅलीत पाहण्यास मिळाले. रॅलीला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आधीच वाहतुक काेंडी असणाऱ्या रस्त्यांवरील काेंडीत भर पडली.
प्रचारात काय मुद्दे गाजले?
गेल्या पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या निवडणुक प्रचारात सत्ताधारी महायुतीकडून लाडकी बहीण याेजना, बेराेेजगारांना देण्यात येणारी मदत आदी याेजनांवर भर दिला गेला. विशेषत: काॅंग्रेसवर माेठ्या प्रमाणावर टिका केली गेली. जात, आरक्षण, संविधानात बदल आदी विषयांवर महायुतीच्या नेत्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला. तर महाविकास आघाडीकडून महायुतीच्या सरकारवर जाेरदार टिका करून त्यांच्या आराेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच राज्याची आर्थिक स्थिती, गद्दारी आदी विषय मांडले गेले. स्थानिक पातळीवर प्रचार करताना, सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांकडून केलेल्या कामांची आकडेवारी सादर केली गेली. तर विराेधी उमेदवारांकडून सत्ताधाऱ्यांनी काहीच विकास केला नसल्याचा आराेप केला गेला.
