आर्यन अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून मनोरंजन विश्वात
फिल्मी दुनियेतील स्टार किड्सचे पदार्पण नेहमीच खास राहिले आहे. आता या यादीत मेगा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या नावाचा देखील समावेश होत आहे. याचदरम्यान अभिनेत्याची मुलगी सुहाना खाननंतर आता मोठा मुलगा आर्यनही नशीब आजमावण्यासाठी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. याची घोषणा नेटफ्लिक्सने केली आहे. आर्यन खान वेब सीरिज त्याच्या डेब्यू सीरिजमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता याला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. विशेष म्हणजे आर्यन अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून मनोरंजन विश्वात प्रवेश करणार आहे.
आर्यन खानची पहिली वेब सिरीज लवकरच रिलीज होणार
गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की आर्यन खान त्याच्या होम प्रोडक्शन रेड चिलीज एंटरटेनमेंट बॅनरखाली वेब सीरिजच्या तयारीत व्यस्त आहे. या मालिकेतून आर्यन दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आता या प्रकरणाबाबत नेटफ्लिक्स इंडियाने ताजी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये आर्यनच्या मालिकेबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. नेटफ्लिक्सने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, नेटफ्लिक्सने रेड चिलीज एंटरटेनमेंटशी हातमिळवणी केली आहे आणि हे दोघे लवकरच एक वेब सीरिज घेऊन येत आहोत, जी गौरी खान निर्मित आणि आर्यन खान दिग्दर्शित असणार आहे.’ असे लिहून नेटफ्लिक्सवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
या घोषणेनंतर शाहरुख खानच्या चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. शाहरुखची झलक त्याच्या मुलाच्या पहिल्या वेब सीरिजमध्येही पाहायला मिळेल, अशी सर्वांना आशा आहे. मात्र, त्याची रिलीज डेट आणि स्टार कास्ट याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही मालिका पुढील वर्षी 2025 मध्ये येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मालिकेत हा स्टार दिसणार आहे
आर्यन खानच्या या वेब सीरिजचे नाव ‘स्टारडम’ मानले जात आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. 90 च्या दशकाचा सुपरस्टार बॉबी देओल आर्यनच्या डेब्यू मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. आणि लवकरच बाकीच्या सहकलाकारची नवे देखील समोर येतील. निर्माता करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ करणच्या सीझन 8 मध्ये, बॉबीने खुलासा केला होता की तो रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनत असलेल्या मालिकेत काम करत आहे, ज्याचा दिग्दर्शक दुसरा कोणीही नाही तर आर्यन खान आहे.
