सातारा : अत्यंत जोखमीची, आव्हानात्मक आणि काहीशी गुंतागुंतीची असलेली रोटाबलेशन अँजिओप्लास्टी या शस्त्रक्रियेद्वारे एका ज्येष्ठ माजी सैनिकाला सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जीवदान मिळाले. इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. मधुसूदन आसावा यांच्या नियंत्रणाखाली ही जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.
जिल्ह्यातील एका ७० वर्षीय माजी सैनिकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. कराडमधील एका हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत होते. हृदयाचे कार्य पूर्वत होण्यासाठी तातडीने रोटाबलेशन अँजिओप्लास्टी करणे गरजेचे होते. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी अद्ययावत कॅथलॅब असलेल्या सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला हलवले.
‘सातारा डायग्नोस्टिक’चे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश शिंदे यांच्या सुचनेनुसार हॉस्पिटलमध्ये सर्व तयारी करण्यात आली. डॉ. जगदीश हिरेमठ यांच्या नियंत्रणाखाली सि. इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट मधुसूदन आसावा, बायपास सर्जन डॉ. हर्षवर्धन सायगावकर, डॉ. नीलेश साबळे व त्यांच्या सहकारी तंत्रज्ञांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
डॉ. आसावा यांनी सांगितले की, एक किंवा दोन रक्तवाहिन्यांत कॅल्शियमचा अडथळा असतो तेव्हा तो बाजूला ढकलणे कठीण असते. अशावेळी बायपास सर्जरी पेक्षा रोटाबलेशन अँजिओप्लास्टी परिणामकारक ठरते. रोटाबलेशन अँजिओप्लास्टी हे मूलत: विशेष डायमंड टिप बुरच्या मदतीने केले जाणारे ड्रिलिंग तंत्र आहे. या प्रक्रियेमध्ये एक छोटा कॅथेटर रक्तवाहिनीत सोडला जातो आणि नंतर त्यातून डायमंड टिप बसवलेले ड्रिल जाते.
या ड्रिलद्वारे कॅल्शियम युक्त ब्लॉकेजेस फोडून रक्तवाहिनी रुंद करून स्टेंट ठेवला जातो. रक्तवाहिनीच्या भिंतींवर जमा झालेला कॅल्शियम युक्त ब्लॉकेजेस काढून टाकल्याने हृदयाकडे शुध्द रक्तप्रवाह सुरळीत होतो. या शस्त्रक्रियेनंतर दोन – चार दिवसातच रुग्ण आपली नेहमीची कामे करू शकतो.
