मुंबई : मुंबई राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने पहिल्याच फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात 115 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत भाजपच मोठा भाऊ ठरत असल्याचे पाहायला मिळते. पहिल्या कौलनुसार महायुतीला 193 जागांवर आघाडी मिळाली असून 55 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. तर, इतरांमध्ये 8 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती आहे. दरम्यान, 288 मतदारसंघाच्या सुरुवातीच्या कलानूसार, भाजपला 115, शिवसेना शिंदे गटाला 58, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला 42 जागा मिळताना दिसत आहे.
288 मतदारसंघाच्या सुरुवातीच्या कलानूसार एकनाथ शिंदेंची शिवसेना 56 जागांवर आघाडीवर आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या 17 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंपेक्षा मोठं यश मिळालं आहे. ठाकरेंच्या बाजूने सहानभुती आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु मतदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला साथ दिल्याचं सुरुवातीच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन राज्यात महायुतीची सत्ता स्थापन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुख्यमंत्री म्हणून जम बसवला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने एकट्याच्या बळावर 100 जागांचा आकडा पार केल्याने आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदावरील दावा आणखी भक्कम झाला आहे. भाजप नेतृत्त्वाने विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली लढवत असल्याचे सांगितले होते. मात्र, आता निवडणुकीत भाजपला मिळालेल्या प्रचंड यशानंतर मुख्यमंत्रीपदी भाजपचाच नेता बसेल, याबद्दलची शक्यता वाढली आहे.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य दरेकर यांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांनी जे धर्मयुद्ध पुकारलं होतं त्यासाठी हम सब एक हैचा नारा जनतेनं मान्य केला. केंद्रात भाजपचं सरकार, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आल्यास राज्याचा विकास होईल, यामुळं अधिक मतदान झालं, असं प्रविण दरेकर म्हणाले. आम्हाला विजयाची खात्री होती. महाराष्ट्राची जनता इतका आशीर्वाद देईल, असं वाटलं नव्हतं. लाडक्या बहिणींना सलाम करतो, त्यांच्यापुढं नतमस्तक होतो, असं दरेकर म्हणाले.
