Explore

Search

April 9, 2025 1:42 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Health News : सतत धुराच्या संपर्कात असणाऱ्यांना सीओपीडीचा धोका

दोन-तीन दशकांपूर्वीच हवामान बदलाचा इशारा संशोधकांनी व अभ्यासकांनी दिला होता. तो इशारा होता थंडी आणि पाऊस एकत्र येणार, तर उन्हाळा आणि कोरडेपणा एकमेकांची साथ सोडणार नाहीत, आणि आता तसेच दिसू लागले आहे. वायू प्रदूषणाने दिल्लीत जणू ठाणच मांडले आहे. प्रदूषणामुळे दिल्लीतील अनेक शाळांना सुट्ट्या दिल्या आहेत. अनेक विमानांची उड्डाणे धुक्यामुळे आणि धुरक्यामुळे लांबली आहेत. आपल्याकडे परिस्थिती फारशी वेगळी नाही. दररोजच्या दररोज प्रदूषणाचे आकडे आपल्यासमोर येत नाहीत इतकेच. रस्त्यांवरून प्रवास करताना आपल्या डोळ्यांनासुद्धा वायू प्रदूषण दिसते; पण नाकावाटे काय काय आत घेतो, हे समजत नाही. केवळ दुर्गंधी किंवा रसायनयुक्त कणांची काही अंशी जाणीव होते. बाकी सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म कण हे विनासायास केवळ फुफ्फुसांपर्यंत नव्हे तर त्याही पुढे रक्तवाहिन्यांद्वारे शरीरभर पसरतात आणि ते पुन्हा कधीच बाहेर येत नाहीत. हे सूक्ष्म कण आपला परिणाम साधतात आणि केवळ विविध प्रकारचे श्वसन विकारच नव्हे तर हृदयविकार, मेंदू विकार आणि काही प्रकारचे कॅन्सर सुद्धा वायू प्रदूषणामुळे उद्भवू शकतात.

वायू प्रदूषण करणार्‍या अनेक घटकांमध्ये एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे धूर. मग तो धूर चुलीचा असो, बंबाचा असो, कचरा पेटविल्यामुळे होणारा धूर असो. शेतामध्ये विविध प्रकारचे गवत किंवा उसाचा पाला पेटविणे असो. एवढेच नव्हे तर आपल्यापैकी अनेकजण सिगारेट, बिडी, गांजा, चिलीम, हुक्का, ई-सिगारेट… अशा प्रकारचे धूम्रपान करत असतात. अनेक जण दैनंदिन जीवनात कामानिमित्त रस्त्यावरून दररोज प्रवास करत असतात. त्यांना रस्त्यावरील वाहनांचा धूर घ्यावा लागतो. रस्त्यावरील विक्रेते आणि आपल्याकडील रस्त्याकडेला असणारी उघडी दुकाने येथे काम करणार्‍या व्यक्ती यांना रस्त्यावरील धूर टाळताच येत नाही. आपल्याकडे वेगवेगळ्या समारंभांच्या निमित्ताने फटाके फोडले जातात. विविध प्रकारचे फटाके मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर टाकत असतात. सर्वसामान्य नागरिकांची यातून सुटका नसते. अशा सर्व स्थितीतील व्यक्तींना श्वसनाचा एक विशिष्ट प्रकारचा विकार संभवतो. त्याला सीओपीडी असे म्हणतात.

सीओपीडी म्हणजे ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज’- दीर्घकाळ साथसंगत करणारा फुफ्फुसांचा आणि श्वासनलिकांचा चिवट विकार.

सीओपीडी बद्दल विशेष लेख लिहिण्याचे कारण म्हणजे नोव्हेंबर महिन्यातील तिसरा बुधवार म्हणजे यावर्षी ‘20 नोव्हेंबर’ हा ‘जागतिक सीओपीडी दिन’ म्हणून जगभर साजरा केला गेला.

सीओपीडी या आजाराबद्दल जागृती करण्यासाठी, जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने हा दिवस, इसवी सन 2002 पासून साजरा केला जातो. या निमित्ताने दरवर्षी एक घोषवाक्य जाहीर केले जाते. यावर्षीचे घोषवाक्य आहे… “Know your lung function’. म्हणजे ‘तुमच्या फुफ्फुसांची क्षमता जाणून घ्या.’

सीओपीडी या विकारात फुफ्फसांचे स्थितीस्थापकत्व कमी होते. दमा आणि सीओपीडी हे दोन वेगवेगळे आजार आहेत. दमा हा आजार अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा दिसतो. पण, सीओपीडी हा प्रौढांमध्ये आढळतो. दमा हा श्वासनलिकांचा विकार आहे आणि तो लवकर आटोक्यात येतो त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. पण, सीओपीडी हा काहीसा दमविणारा आजार आहे.

आपल्यापैकी अनेकांना दम लागणे किंवा धाप लागणे ही तक्रार कमी-अधिक प्रमाणात असते. अनेकांना खोकला असतो; पण अनेक जण या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. जोपर्यंत आपले काम थांबत नाही तोपर्यंत तात्पुरत्या गोळ्या किंवा खोकल्याची औषधे घेऊन काम चालविले जाते. जेव्हा आजार बळावतो, तेव्हा अनेकांना जाग येते. सिगारेट-बिडी किंवा अन्य प्रकारचा धूर, वायू प्रदूषण, अल्फा वन अँटिट्रिप्सिनची कमतरता आणि वाढते वय ही सीओपीडी ची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे असा धोका असणार्‍या व्यक्तींनी जागरूक राहावे. आरोग्याबाबत जागरूक असणार्‍या व्यक्ती उच्चरक्तदाब, हृदयविकार, मधुमेह अशा आजारांबाबत दक्ष राहून त्यासंबंधी तपासण्या करून घेतात. जसे की ब्लडप्रेशर, ब्लडशुगर, कोलेस्टेरॉल, ईसीजी इ. पण अनेकजण श्वसनसंस्थेच्या बाबतीत मात्र उदासीन असलेले दिसतात.

चाळिशीनंतरच्या व्यक्तींनी आपल्या फुफ्फुसांची क्षमता वर्षातून किंवा दोन वर्षांतून किमान एकदा तपासून घ्यायला हवी. पल्मोनरी फंक्शन टेस्ट (PFT) ही संगणकीय चाचणी फुफ्फुसांची क्षमता दर्शविणारी चाचणी आहे. ज्यांना दीर्घकालीन श्वसनविकार आहे किंवा ज्यांना कोव्हिड झाला होता, अशा व्यक्तींनी यापुढची डीएलसीओ (DLCO) म्हणजे ‘डिफ्युजन कॅपॅसिटी ऑफ कार्बन मोनॉक्साईड’ ही चाचणी करून घ्यावी.

या चाचण्यांमुळे आपल्या फुफ्फुसांची, श्वासनलिकांची कार्यक्षमता समजते. केवळ सीओपीडीच नव्हे तर दमा, आय.एल.डी. आणि श्वसनसंस्थेच्या अन्य विकारांचे लवकर निदान होते.

आज-काल श्वसनविकाराने त्रस्त रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. रस्त्यावरील विक्रेते, दुचाकीधारक, पादचारी, ट्रॅफिक पोलिस इ. यांना सीओपीडीचा धोका अधिक संभवतो.

म्हणून सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. रोगप्रतिकारक्षमता उत्तम ठेवावी. सकस आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती, व्यसनमुक्त जीवन आणि तणावरहित जीवनशैली या पंचसूत्रीचा अवलंब करावा. नियमित प्राणायाम आणि योगासने आपला श्वास तंदुरुस्त ठेवतात, हे जागतिक सीओपीडी दिनाच्या निमित्ताने जरूर लक्षात ठेवावे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy