Explore

Search

April 9, 2025 1:34 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

New Delhi : गौतम अदानींवरील भ्रष्टाचाराचे आरोप काय?

नवी दिल्ली : ऊर्जा क्षेत्रातील कंत्राटं मिळवण्यासाठी भारतातील काही राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांना सुमारे 265 दशलक्ष डॉलरची (2200 कोटी रुपये) लाच दिल्याप्रकरणी गौतम अदानींसह त्यांच्या सात अधिकाऱ्यांना अमेरिकी न्याय विभागाने दोषी ठरवलं आहे. भारतामध्ये सौरऊर्जा प्रोजेक्ट्समधील महागडी वीज राज्यांनी खरेदी करावी, यासाठी त्या राज्यांमधील सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप गौतम अदानी यांच्यावर झाला आहे. अमेरिकेतील गुंतवणूकदारांना प्रभावित करणाऱ्या या कृत्यापासून त्यांना अंधारात ठेवल्याचा आरोपही अदानी ग्रुपवर आहे. याप्रकरणी न्यूयॉर्कमधील न्यायालयात त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. या लाचखोरीप्रकरणी दोन वेगवेगळे खटले दाखल झाले आहेत. त्याचे पडसाद आता भारतातही उमटले आहेत. यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष्य केलंय. दुसरीकडे शेअर मार्केटमध्येही अदानी ग्रुपच्या शेअर्सना फटका बसला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचं खूप नुकसान झालंय. तर अदानी ग्रुपने त्यांच्याविरोधातील हे सर्व फेटाळून लावले आहेत.

कशासाठी खटला?

अमेरिकेच्या सहाय्यक सरकारी वकील लिझा मिलर यांनी न्यूयॉर्कमधील न्यायालयात अदानींच्या लाचखोरप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार 2020 ते 2024 या काळात अदानी ग्रीन एनर्जी आणि ग्रुपमधील अन्य कंपन्यांनी अमेरिकेतून 2 अब्ज डॉलर उभे केले. यात आंतरराष्ट्रीय अर्थपुरवठा संस्थांचं कर्ज आणि 1 अब्ज डॉलरच्या बॉड्सचा समावेश होता. भारतात वीजपुरवठ्याची कंत्राटं मिळविण्यासाठी अमेरिकेतील गुंतवणूकदारांच्या पैशातून विविध राज्यांनी महागडी वीज खरेदी करावी, यासाठी तिथल्या अधिकाऱ्यांना 2200 कोटी रुपये लाच दिल्याचा ठपका अदानी ग्रुपवर ठेवण्यात आला आहे. या राज्यांमध्ये ओदिशा, तामिळनाडू, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश आणि जम्मू-काश्मीर यांचा समावेश आहे. भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना 250 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक लाच देणं, अब्जावधी डॉलरसाठी गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटं बोलणं आणि न्यायप्रक्रियेत अडथळा आणणं हे आरोप अदानी ग्रुपवर करण्यात आले आहेत.

कोणकोणावर खटला दाखल?

गौतम अदानींसह त्यांचा भाचा आणि अदानी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी अधिकारी सागर अदानी, कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत जैन, नवी दिल्लीत मुख्यालय असलेल्या अज्योर पॉवर (Azure Power) या कंपनीचा फ्रान्सचा नागरिक असलेल्या अधिकारी सिरिल सबास्टियन डॉमिनिक कॅबानीज, कॅनडातील एक पेन्शन फंड कंपनीतील तीन माजी अधिकऱ्यांवर खटला दाखल करण्यात आले आहेत. तर अमेरिकेतील ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन’नेदेखील गौतम अदानी, सागर अदानी आणि कॅबानीज यांच्यावर स्वतंत्र अमेरिकी गुंतवणूकदारांची दिशाभूल आणि फसवणूक केल्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy