फुलकोबी अर्थात फ्लॉवर कोणत्याही ऋतूत उपलब्ध होतो आणि असंख्य प्रकारच्या खाद्यपदार्थात सढळ हाताने वापरला जातो. अर्थात फक्त चविष्ट पदार्थ बनवता येतात म्हणून नाही; तर मानवी शरीराला उपयुक्त अशा अनेक गुणधर्मांमुळे फ्लॉवर अर्थात फुलकोबीचं आहारात महत्त्वाचं स्थान आहे.
फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 आणि फोलेट असे अनेक पोषक घटक फ्लॉवरमध्ये असतात. कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटिन, कार्बोहाईड्रेटस्, व्हिटॅमिन्स, आयोडिन, पोटॅशियम यांनी फ्लॉवर समृद्ध असतो. दाह-विरोधी गुणधर्मासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या क्षमतेसाठी फ्लॉवर ओळखला जातो. फ्लॉवरमध्ये व्हिटॅमिन के असतं. त्यामुळे फ्लॉवर हा चयापचय, रक्तातील कॅल्शियम पातळीच्या नियंत्रणासाठी तसंच रक्त गोठण्यासाठी उपयुक्त ठरतो. फ्लॉवरमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. फ्लॉवरमधलं फायबर आणि ओमेगा 3 अॅसिडमुळे ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ कमी होण्यास हातभार लागतो.
फुलकोबी खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेहाचा धोका कमी होतो. फ्लॉवरमध्ये भरपूर फायबर असतं. त्यामुळे नियमित खाल्ल्यास पचनास फायदा होतो. वजन कमी करायचं असेल आणि सहजपणे शरीर हायड्रेटेड ठेवायचं असेल तर फ्लॉवर खाणं फायद्याचं. आपल्यातल्या अनेकांना ठाऊक असेल की कोलीन हे पोषकतत्त्व मज्जासंस्थेच्या कार्यामध्ये आणि चयापचय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतं. फ्लॉवर खाल्ल्याने शरीरास कोलीनचा पुरवठा होतो. फ्लॉवर रक्त शुद्ध करण्यास हातभार लावतो.
त्याचबरोबर संसर्गापासून त्वचेचा बचाव करतो आणि सांधेदुखी, हाडांच्या दुखण्यावरही गुणकारी मानला जातो. पोटदुखी कमी करण्यासाठी आणि एकंदरच पचनक्रिया सुधारण्यासाठी तसंच सुरळीत राखण्यासाठी फ्लॉवर उपयुक्त ठरतो. शरीरातील विषद्रव्यं दूर करण्याबरोबरच पोटाचा अल्सर व पोटाचा कॅन्सर यापासून संरक्षण करण्यासाठी फ्लॉवर खाण्याचा सल्ला दिला जातो.
