शाळा-कॉलेजेस बंद
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फेंगल चक्रीवादळ पुद्दुचेरीजवळील किनारपट्टीवर शनिवारी आदळले. यामुळे या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुद्दुचेरी आणि तमिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत सरकारने राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद केल्या आहेत.
फेंगल चक्रीवादळाचा तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये सर्वाधिक प्रभाव दिसून आला आहे. पद्दुचेरीमध्ये ३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. तमिळनाडूमध्ये भूस्खलनही अनेक ठिकाणी झाल्याचे दिसून आले आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार अजुनही परिस्थिती निवळलेली नाही. आजही तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने सर्व सरकारी आणि खासगी शाळांना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पद्दुचेरी मध्ये फेंगल चक्रीवादळामुळे अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे राज्य सरकारने सोमवार २ डिसेंबरलाही शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याची घोषणा केली आहे. फेंगल कमकुवत झाल्यावर ते पश्चिम आणि उत्तर-पश्चिमच्या दिशेने सरकत आहे. ते पुढे ३ डिसेंबर रोजी कमी दाब क्षेत्राजवळ केरळ-कर्नाटकच्या सीमावर्ती भागात पोहोचण्याची शक्यता आहे. या शिवाय तमिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये देखील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
