युवक जागीच ठार
ओझर्डे : वाई शहरातील शहाबाग फाटा येथे मंगळवारी रात्री दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात प्रतिक राजेंद्र जाधव (वय 20, रा. शेंदूरजणे, ता. वाई) या युवकाचा मृत्यू झाला. या घटनेची वाई पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
दरम्यान, वाईतून घरी जात असताना हा अपघात झाला आहे. प्रतिक हा कामानिमित्त वाईला दुचाकीवरून गेला होता. काम झाल्यानंतर मंगळवारी रात्री शेंदूरजणे या आपल्या गावी निघाला. त्याची दुचाकी शहाबाग फाट्यावर आली असता समोरून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिली. यामध्ये प्रतिक काही फूट अंतरावर उडून पडला. यामध्ये जास्त रक्तस्त्राव झाल्याने प्रतिकचा जागीच मृत्यू झाला.
