हिवाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत नाचणी आणि बाजरीचे आवर्जून सेवन केले जाते. नाचणीचे पीठ अनेक पोषक घटकांनी योगी असते. नाचणी खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात लोह मिळते. आपल्या आहारात नाचणीचा समावेश करण्याचा सल्ला वारंवार दिला जातो. तुम्हाला नाचणी खायला आवडत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही यापासून खमंग आणि पौष्टिक असे थालीपीठ तयार करू शकता. हे थालीपीठ आरोग्यासह चवीलाही अप्रतिम लागतात. लहान मुलांना पौष्टिक अन्न खाऊ घालण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे.
सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही या पदार्थाचा आपल्या आहारात समावेश करू शकता. हे नाचणीचे थालीपीठ फार कमी साहित्यापासून तसेच कमी वेळेत बनून तयार होतात. ज्यामुळे कामाच्या गडबडीत तुम्ही झटपट हा चवदार पदार्थ बनवून घरातील सदस्यांना खुश करू शकता. हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या लोकांनी तर नाचणीचा आपल्या आहारात विशेष करून समावेश करावा. थंडीच्या वातावरणात हे गरमा गरम थालीपीठ तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरतील. चला तर मग पटकन जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती
साहित्य
- 1 वाटी नाचणीचे पीठ
- 1/2 वाटी बाजरीचे पीठ
- 1/2 वाटी बेसन
- 2 चमचे लाल तिखट
- मीठ चवीनुसार
- 1 बारीक चिरलेला कांदा
- 1 वाटी गाजर
- 1 वाटी बीट
- 1/2 वाटी कोथिंबीर
- तूप आवश्यकतेनुसार
कृती
- नाचणीचे खमंग थालीपीठ तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक परात घ्या आणि यात नाचणीचे पीठ टाका
- मग यात बेसन पीठ, चिरलेल्या कांदा, कोथिंबीर, किसलेला गाजर आणि बिट टाका
- यानंतर यात मीठ आणि लाल तिखट घाला (तुमच्या आवडीचा मसाला तुम्ही यात घालू शकता)
- आता सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा आणि पीठ मळून घ्या
- यानंतर तयार पिठाचे लहान लहान गोळे तयार करा
- दुसरीकडे गॅसवर तवा तापत ठेवा
- लहान गोळ्यांचे थालीपीठ बनवून घ्या आणि तवा तापला की तव्यावर ते छान भाजून घ्या
- थालीपीठ भाजताना दोन्ही बाजूंना तेल लावा, जेणेकरून तुमचे थालीपीठ छान खरपूस भाजले जातील
- अशाप्रकारे तुमचे नाचणीचे थालीपीठ तयार होतील
- तयार थालीपीठ एका प्लेटमध्ये काढा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा
- तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता
