5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सातारा : सातार्यातील गोडोली येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी उघड केला. याप्रकरणात धाराशिव जिल्ह्यातून एकाला अटक करुन पोलिसांनी त्यांच्याकडून 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान, दुसर्या संशयिताचेही नाव समोर आल्यानंतर त्याला सातार्यातून अटक करण्यात आली.
राजकुमार उर्फे राजू ओमकार अप्पा आपचे (वय 30, रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव), अर्षद सत्तार बागवान (वय 32, रा. शनिवार पेठ, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, दि.21 नोव्हेंबर रोजी गोडोली येथील गौरव रेसीडन्सी या अपार्टमेंटमध्ये दिवसा बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने सोन्याचे दागिने चोरले. सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तांत्रिक तपासात एका सराईतचे नाव पोलिसांना समजले. त्या चोरट्यावर सुमारे 25 गुन्हे दाखल आहेत. संशयित हा वारंवार जागा बदलून पळत असल्याने पोलिसांना तपासावर मर्यादा येत होत्या.
अखेर सातारा शहर पोलिसांना संशयित धाराशीव जिल्ह्यामध्ये असल्याचे समजले. दोन दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. दुचाकीवरुन संशयित पळून जात असताना पोलिसांनी त्याला पकडले. अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला 3 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. प्राथमिक तपासामध्ये त्याला या गुन्ह्यात सातार्यातील संशयिताने मदत केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी दुसर्या संशयितावर कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी चोरीत गेलेले 5 लाख 60 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोनि सचिन म्हेत्रे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे (डीबी) सपोनि श्याम काळे, सपोनि रूपाली मोरे, फौजदार अनिल जायपत्रे, सुधीर मोरे, अशोक सावंजी, पोलिस निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, मोहन नाचण, पंकज मोहिते, विक्रम माने, इरफान मुलाणी, अमोल निकम, मच्छिंद्रनाथ माने, संतोष घाडगे, सागर गायकवाड, सचिन रिटे, विशाल धुमाळ, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी कारवाईत सहभाग घेतला.
