नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांना अजित पवार गटाच्या वतीने संपर्क करण्यात आल्याचे समजते. एका महिला पदाधिकाऱ्याला ही जबाबदारी देण्यात आली असून काही खासदारांशी चर्चा झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. शरद पवार विरुद्ध अजित पवार लढाईत निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे दिले आणि तिथून पुन्हा अंकाला सुरुवात झाली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार कामगिरी केली आणि पक्षाच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच ८ खासदार निवडून आणले. पुढे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली. गुरुवारी अजित पवारांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांनी ‘मिशन दिल्ली’ सुरू केल्याच्या चर्चा आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘मिशन दिल्ली’द्वारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही खासदारांना अजित पवारांच्या पक्षाकडून संपर्क करण्यात आला आहे. या मिशनची जबाबदारी एका महिला नेत्याकडे देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी खुद्द अजित पवारांनी दिल्ली दौरा केला, हे उल्लेखनीय आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपप्रणित एनडीएची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीतल्या यशानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळे सरकार म्हणून असलेली ताकद पाहता पुढच्या काळात घडणाऱ्या घडामोडी कशा घडतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
