ममता बॅनर्जी यांचं सविस्तर उत्तर
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा राजकीय वारस कोण असेल? भविष्यात तृणमूल काँग्रेसची (टीएमसी) धुरा कोणाकडे असेल? हा पश्चिम बंगालच्या राजकारणातील चर्चेचा विषय आहे. आतापर्यंत वारंवार असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता खुद्द ममता बॅनर्जी यांनी याचा खुलासा केला आहे. ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी न्यूज18 बांग्लाला एक मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांचा वारस कोण असेल हे स्पष्ट केलं. जो काही निर्णय होईल, तो एकटीचा नसेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
या मुलाखतीत ममता म्हणाल्या की, वारस कोण असेल हे पक्ष ठरवेल. टीएमसी हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे. तिथे कोणीही आपल्या अटी लादू शकत नाही किंवा कोणावर वर्चस्व गाजवू शकत नाही. त्या म्हणाल्या, “जनतेसाठी काय योग्य असेल, याचा विचार करून पक्ष निर्णय घेईल. आमच्याकडे आमदार, खासदार, बूथ कार्यकर्ते संयुक्तपणे काम करतात.” नवीन पिढीला संधी देण्याबाबत ममता म्हणाल्या की, सर्व (जुन्या आणि नवीन पिढीचे नेते) महत्त्वाचे आहेत. आजचा नवखा असलेला नेता भविष्यात अनुभवी होईलच.
ममता पुढे म्हणाल्या की, हे एकट्याचं काम नाही. पक्ष एकसंध होता, आहे आणि भविष्यातही राहील. इथे अहंकार चालणार नाही. तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी हे वक्तव्य केलं आहे. जुन्या आणि तरुण नेत्यांमध्ये पक्षांतर्गत वर्चस्वाची लढाई सुरू आहे. मक्तेदारीची चर्चा फेटाळून लावत ममता म्हणाल्या की, मी एकटी म्हणजे पक्ष नाही. अनेकांचा मिळून पक्ष तयार झाला आहे. हे एक कुटुंब आहे आणि येथे एकत्रितपणे निर्णय घेतले जातात.
टीएमसीने अद्याप ममता बॅनर्जींचा वारस जाहीर केला नसला तरी जुने नेते आणि तरुण पिढीतील नेते यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केलं आहे. जुने नेते ममता बॅनर्जींचे निष्ठावंत मानले जातात. नव्या पिढीतील नेते अभिषेक बॅनर्जींना जवळचे मानतात.
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हे बंगालच्या तरुणांमध्ये जास्त लोकप्रिय मानले जातात. टीमएमसीच्या कोणत्याही नेत्यापेक्षा ते जास्त लोकप्रिय आहेत. अभिषेक पक्षामध्ये हस्तक्षेप करत असल्याची टीका जुने नेते करत आहेत.
