लांजा : देवदिवाळीचे औचित्य साधून लांजा तालुक्यातील साटवली गांगोवाडी येथील तरुणांनी एकत्रित येत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साटवली गढी येथे हजारो दीपोत्सव प्रकाशित केले आणि देवदीपावली साजरी केली. त्यामुळे दिव्यांच्या प्रकाशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली साटवली गढी उजळून निघाली होती.
एकीकडे गढी शासनाकडून दुर्लक्षित असून तरुणांनी ऐतिहासिक गढीवर दीपावली उत्सव साजरा करून गड-किल्ले जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश दिला आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात कोकणात साधनसामुग्री जलमार्गे वाहतूक करून ती साठा करून ठेवण्याची भूमिका गढी किल्ला बजावत होते. दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारे व त्या काळात तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून उदयास आलेले तालुक्यातील साटवली येथील ऐतिहासिक बंदर आणि गढीकडे पुरातत्त्व विभागाचे तसेच स्थानिकांचे दुर्लक्ष झाल्याने सद्यस्थितीत ही गढी सुस्थितीत आणण्याची अत्यंत गरज आहे. लांजा येथील दुर्गवीर प्रतिष्ठान, शिवगंध प्रतिष्ठान, लांजा व साटवली गावातील स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने साटवली किल्ला संवर्धनाच्या दृष्टीने दरवर्षी स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. देव दिवाळीच्या निमित्ताने लांजा तालुक्यातील साटवली गांगो वाडीतील तरुणांनी साटवली गढी परिसर हजारो दिव्यांनी प्रकाशित करून दीपोत्सव साजरा केला. व शिवरायांचे गड-किल्ले जतन करून संवर्धन करण्याचा संदेश दिला.
गांगोवाडी येथील प्रसाद तरळ, प्रकाश कातकर, सौरभ कांबळे, लक्ष्मण तरळ, नितीन तरळ, सखाराम बापेरकर, शिवाजी तरळ, सचिन तरळ यांनी हजारो दिव्यांची आरास गढीवर केली. या दिव्यांच्या प्रकाशाने गढी उजळून निघाली होती. यावेळी छत्रपती ‘श्री शिवाजी महाराज की जय’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
