सातारा : जिल्ह्यातील ढगाळ वातावरण हळूहळू निवळू लागल्याने किमान तापमानात उतार येत चालला आहे. गुरूवारी सातारा शहरात १९.५ अंशाची नोंद झाली. त्यामुळे थंडी पुन्हा परतू लागली आहे. तर मागील तीन दिवसांपूर्वी किमान तापमान वाढून २२ अंशावर पोहोचले होते.
जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरूवात होते. फेब्रुवारी महिन्यापर्यंत थंडीचा मुक्काम राहतो. त्यातच डिसेंबर महिन्याच्या मध्यानंतर कडाक्याची थंडी पडण्यास सुरूवात होते. जानेवारी महिनाही थंडीतच काढावा लागतो. पण, यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच जिल्हावासीयांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. १५ नोव्हेंबरपासून थंडीला सुरूवात झाली. हळूहळू किमान तापमानात उतार येत गेला. त्यामुळे सातारा शहराचा पारा ११.८ अंशापर्यंत खाली आला होता.
मागील काही वर्षांतील नोव्हेंबर महिन्यातील हे नीच्चांकी तापमान ठरलेले होते. तसेच महाबळेश्वरचा पारा ही १०.५ अंशापर्यंत घसरलेला. यामुळे जिल्ह्यातच थंडीची लाट आल्याचे चित्र होते. कारण, सलग १० दिवस कडाक्याची थंडी असल्याने जनजीवनावर परिणाम झालेला. शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागला होता. पण, मागील पाच दिवसांपासून पारा वाढत गेला.
सातारा शहरवासीयांना मागील काही दिवसांपासून थंडीपासून दिलासा मिळाला. कारण, किमान तापमान वाढून २२ अंशावर गेले होते. त्यातच ढगाळ वातावरण असल्याने थंडी गायब झाल्याचे चित्र हाेते. सध्या ढगाळ वातावरण निवळू लागले आहे. सूर्यदर्शन ही होत आहे. यामुळे पुन्हा किमान तापमानात उतार येत चाललाय. गुरूवारी सातारा शहरात १९.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरचा पारा ही १७.४ अंश नोंद झाला होता. परिणामी थंडीला पुन्हा सुरूवात होणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
