बामणोली : महाराष्ट्रातील ट्रेकर्स पर्यटकांना भुरळ घालणारा म्हणून ओळख असणार्या किल्ले वासोटा रविवारी पर्यटकांनी वर्दळून गेला. सलग दुसर्या रविवारी वासोट्यावर 191 बोटींमधून 3035 पर्यटकांनी किल्ले ट्रेक केला.
भैरवनाथ बोट क्लब बामणोली, बोट क्लब शेंबडी, केदारेश्वर बोट क्लब मुनावळे या तीन बोट क्लबमधील सुमारे 191 बोटींतून 3035 पर्यटकांनी किल्ले वासोट्याचा ट्रेक केल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालय बामणोली येथील अधिकारीवर्गाकडून देण्यात आली. सध्या थंडीची चाहूल लागल्याने वासोटा किल्ला पाहण्यासाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी पर्यटक बामणोली, शेंबडी, मुनावळे या संपूर्ण परिसरामध्ये आदल्या दिवशी मुक्कामासाठी गर्दी करत असून हॉटेल, टेन्ट बुकिंग आठवडाभर अगोदरच फुल होत आहे. त्यातच टेन्टमध्ये राहण्याची मजा काही वेगळीच असून, टेन्टच्या जवळच शेकोटी करून त्याभोवती कराओके गाण्यांची मैफल रंगून रात्र पर्यटक जागवू लागले आहेत.
या परिसरामध्ये मुक्कामाची सोय अपुरी पडल्यावर पर्यटक कोळघर, अंधारी, फळणी, उंबरेवाडी, कास या परिसरातदेखील टेन्ट लावून मुक्कामाचा आनंद लुटत आहेत. बामणोली, शेंबडी, मुनावळे या ठिकाणाहून तास दीड तासाचा बोटीचा प्रवास करून पर्यटक किल्ल्याच्या पायथ्याला गेल्यावर घनदाट जंगलातून ट्रेकला सुरुवात करतात. या घनदाट जंगलातून जाताना वेगवेगळ्या पशू-पक्ष्यांचे आवाज ऐकून तसेच निसर्गसौंदर्याचा आनंद लुटत आहेत.
