सातारा : सातारा जिल्ह्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्याचा बॉयलर पेटला आहे. उसाचे गाळप सुरू असून वाहतूकही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु, अद्यापही प्रति टन उसाचा दर जाहीर केला नाही. याबाबत प्रशासनाने तातडीने बैठक लावावी. अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.
रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. सध्या उसाला दर देण्याच्या मागणीसाठी शेतकरी वर्ग रयत क्रांती संघटने कडे संपर्क साधत आहे. त्यामुळे सन २०२५ च्या ऊस गळीत हंगाम शांततेत व्हावा. यासाठी रयत क्रांती संघटनेने सहकार्याची भूमिका घेतलेली आहे.
पंधरा दिवस होऊन सुद्धा अद्यापही कोणत्याही साखर कारखान्याने किमान दर उसाचा न ठरवल्यामुळे शेतकऱ्यांना आता रस्त्यावर उतरावे लागणार आहे. तत्पूर्वी लोकशाही मार्गाने शासकीय पातळीवर बैठक होणे गरजेचे आहे. ज्यावेळी शेतकऱ्याच्या शेतातून ऊस घेऊन गेला की, त्यानंतर १४ दिवसात सदर उसाची रक्कम त्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणे बंधनकारक आहे. परंतु अद्यापही याबाबत ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे रयत क्रांती संघटनेने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. असे यावेळी सांगण्यात आले.
सदर बैठक घेण्याबाबतचे निवेदन सातारचे अपर जिल्हा अधिकारी जीवन गलांडे यांना रयत क्रांती संघटनेचे अनिल बाबर, नामदेव कदम, सूर्यकांत नलावडे, किशोर शिंदे व स्वतः रयत क्रांती संघटनेचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश साबळे उपस्थित होते. यावेळी सातारा शहर पोलीस निरीक्षक यांनाही प्रत देण्यात आलेली आहे.
