सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर सातारा ते कराडच्या हद्दीमध्ये नेहमी गंभीर अपघात होणारे 8 ब्लॅकस्पॉट आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये या आठ ठिकाणी झालेल्या 68 अपघातांत 48 जणांना जीव गमवावा लागला आहे. कराड तालुक्यात ब्लॅकस्पॉटची संख्या जास्त असून येथील अपघातांचे प्रमाणही मोठे आहे.
महामार्गावर ज्या ठिकाणी कायमच अपघात होतात, त्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट समोर येतात. वारंवार त्याच ठिकाणी अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागतो. अनेक जण या अपघातांमध्ये जायबंदी होत असतात. महामार्गावरील गैरसोयी याला कारणीभूत ठरतात. महामार्गावर ज्या गावांच्या फाट्यावर उड्डाणपूल तयार केले नव्हते, त्या ठिकाणी स्थानिक जनतेला महामार्ग ओलांडण्याशिवाय पर्याय नसतो. शेतीच्या कामानिमित्ताने शेतकरी बैलगाडी, ट्रॅक्टर घेऊन महामार्ग ओलांडत असतात. शाळेच्या निमित्तानेही स्थानिकांना महामार्ग ओलांडावा लागतो. मात्र, वाहनांचा प्रचंड वेग महामार्ग ओलांडणार्यांसाठी काळ ठरतो. त्यामुळे कुठल्याही निमित्ताने जनतेला महामार्ग ओलांडावा लागू नये, यासाठी उड्डाणपुलांची निर्मिती केली जात आहे. या उड्डाणपुलांमुळे अपघातांची संख्या कमी होते. ब्लॅक स्पॉटही कमी होऊ लागले आहेत.
मागील तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार भुईंजजवळ वेळे गावच्या हद्दीत खंबाटकी बोगद्याजवळ 13 अपघात झाले त्यामध्ये 11 जणांना जीव गमवावा लागला आहे. उंब्रजजवळ कोर्टी फाटा येथे झालेल्या 5 अपघातांमध्ये 6 जणांचा जीव गेला. कराड शहराजवळ मलकापूर फाटा येथे 7 अपघातांत 4 जणांना जीव गमवावा लागला. नारायणवाडी, पाचवड फाटा (ता. कराड) येथील 11 अपघातांत 6 जणांचा जीव गेला. मालखेड फाटा (ता. कराड) येथे 9 अपघातांत 4 जणांना जीव गमवावा लागला. पारगाव फाटा (खंडाळा) येथे 9 अपघातांत 5 जणांचा जीव गेला. म्हसवे (ता. सातारा) येथील अपघातात 7 अपघातांत 3 जणांचा मृत्यू झाला. शेंद्रे फाटा (ता. सातारा) येथे 7 अपघातांत 7 जणांचा जीव गेला.
