उप जिल्हाधिकारी महसूल यांनी दिली स्टॅम्प व्हेंडरांना ताकीद
सातारा : सातार्यातील 100 रुपयांच्या स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांनी आज एल्गार पुकारत स्टॅम्प व्हेंडरांच्या शेजारी उभे राहून खातरजमा केली असता ही टंचाई फक्त कृत्रिम असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेताच महसूल विभागाचे उप जिल्हाधिकारी संजय पाटील यांनी स्टॅम्प व्हेंडरांना आपल्या दालनात बोलावून सक्त ताकीद दिली आहे. त्यामुळे उपस्थित सर्वसामान्यांनी भोगावकर यांचे आभार मानले आहेत.
आज दि. 12 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष सरदार (सागर) भोगांवकर यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर अनेकांचे स्टॅम्प टंचाईबाबत फोन आले. यानंतर त्यांनी त्याची खातरजमा करण्यासाठी तडक तहसिलदार कार्यालय गाठले. याठिकाणी स्टॅम्प व्हेंडरांच्या शेजारी उभे राहून त्यांनी पाहणी केली असता संबंधित स्टॅम्प व्हेंडर हे 100 रुपयांचे स्टॅम्प शिल्लक नसल्याचे बर्याच जणांना सांगून तसेच काहीजणांकडून 50 रुपये ज्यादा घेवून त्याची विक्री करताना आढळून आले. भोगावकर यांना ही बाब खटकताच त्यांनी याबाबतची माहिती महसूल विभागाचे उप जिल्हाधिकारी संजय पाटील यांना दिली. तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडली तर आंदोलनाचीही तयारी असल्याचे सांगितले.
भोगावकरांच्या आंदोलनाच्या इशार्यानंतर उप जिल्हाधिकारी पाटील यांनी संबंधित स्टॅम्प व्हेंडरांना आपल्या दालनात बोलावून खडे बोल सुनावले. यानंतर सर्व स्टॅम्प व्हेंडरांनी सर्वसामान्यांना 100 रुपयांचे स्टॅम्प वितरीत करण्यास सुरुवात केली. भोगावकरांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला 400 रुपयांची मिळणारी झळ वाचली आहे. त्यामुळे उपस्थितांनी भोगावकरांना धन्यवाद दिले आहेत.
…तर 100 रुपयांच्या स्टॅम्पला आडकाठी नाही : प्रांताधिकारी सुधाकर भोसले
सेल्फ अटेस्टेड असेल तर 100 रुपयांच्या स्टॅम्पला आमची कोणतीच आडकाठी नसल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली आहे. जर कोणी 100 रुपयांचे स्टॅम्प देण्यासाठी गरजूची अडवणूक करीत असेल तर वेळप्रसंगी त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, अशाही सक्त सूचना त्यांनी दिल्या आहेत.
