दिल्ली : राज्याच्या राजकरणातून एक मोठी बातमी सामोर येथ आहे. दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. त्यामुळे संमेलनाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार आहे. २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शरद पवार हे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख अतिथी म्हणून या साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याची विनंती केल्याची माहिती समोर येत आहे.
३७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी केले होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, हा निर्णय विधानसभा निवडणुकीपूर्वीच घेण्यात आला. त्यामुळे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
तालकटोरा स्टेडियमवर पंतप्रधान आले तर सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होईल, लोकांची गैरसोय होईल. म्हणून साहित्य संमेलनाचे उद्घाटन दिल्लीतील विज्ञान भवन मध्ये व्हावं अशी संयोजक आणि स्वागत अध्यक्ष यांची विनंती आहे. पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.पंतप्रधान मोदी यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केल्यास पवार आणि मोदी एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.
