Explore

Search

April 7, 2025 1:58 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : आता सातारा जिल्हा झाला कॅबिनेट मंत्र्यांचा जिल्हा

जिल्ह्याला नव्याने मिळाली नवी ओळख; महायुतीने साधला राजकीय समन्वय

सातारा : गेल्या 58 वर्षाच्या इतिहासात सातारा जिल्ह्याच्या यशवंत भूमीला तब्बल पाच कॅबिनेट मंत्री पदे मिळाली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे व आमदार मकरंद पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने सातारा जिल्ह्याच्या राजकारणाची आगामी दिशा वेगळीच असणार आहे. राष्ट्रवादी अजितदादा गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट व भाजप या तिन्ही गटांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने महायुतीने सातारा जिल्ह्यात राजकीय समतोल साधल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा जिल्ह्याच्या राजकारणाने गेल्या सहा दशकामध्ये मंत्रिमंडळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर राजकीय संधी अनुभवली नव्हती. सातारा जिल्हा हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या यशवंत विचारांचा जिल्हा मानला जातो. सुरुवातीला कॉंग्रेसचा आणि नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्‍या सातारा जिल्ह्यामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीने आपली घट्ट पकड बसवली आहे. ही राजकीय पकड आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने रणनीती आखत पश्चिम महाराष्ट्रातील 10 कॅबिनेट मंत्री पदापैकी सातारा जिल्ह्याला महायुतीने पाच कॅबिनेट मंत्री पदे दिली आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील व आमदार जयकुमार गोरे यांना संधी देण्यात आली आहे. शिंदे आणि देसाई वगळता जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे आणि मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदी प्रथमच संधी मिळत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला आगामी पाच वर्षांमध्ये मोठी गती मिळणार आहे. जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर मार्गी लागणार असल्याची चिन्हे आहेत.
सातारा जिल्हा हा तसा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण राजकीय इतिहासाचा धांडोळा घेतला तर गेल्या 58 वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मंत्रिपदे मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर जल्लोष केला. भारतीय जनता पार्टीच्या सातारा येथील कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि त्यांच्या सहकार्‍यांनी एकमेकांना पेढे भरवून या निर्णयाचे स्वागत केले आहे.
आमदार जयकुमार गोरे यांना माढा लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने ताकद देण्यात आली आहे, तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दाखवलेली पक्षनिष्ठा तसेच राजकीय वर्चस्व, भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमांचा केलेल्या प्रचार याची दखल घेऊन शिवेंद्रसिंहराजे यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आला आहे. शिंदे गटाने सुद्धा सातारा जिल्ह्यात आपली पक्की मांड बसवण्याच्या दृष्टीने शंभूराज देसाई यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदी संधी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपण शब्दाचे पक्के आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून देत कॅबिनेट मंत्रीपदी आमदार मकरंद पाटील यांना संधी दिली आहे. सातारा जिल्ह्यात पाच कॅबिनेट मंत्री पदे आल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy