नागपुर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून उपराजधानी नागपुरात सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि विधानपरिषद आमदार उद्धव ठाकरे हे आज अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे हे अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही सदिच्छा भेट घेतली असल्याची शक्यता आहे.
भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर २०१९ पासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय मतभेदांनी टोक गाठल्याचं पाहायला मिळालं होतं. दोन्ही नेत्यांनी विविध व्यासपीठांवरून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसंच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. “एक तर तू राहशील किंवा मी राहीन,” असे टोकाचे उद्गारही उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका मेळाव्यादरम्यान फडणवीस यांना उद्देशून काढले होते. या राजकीय कटुतेच्या पार्श्वभूमीवर आज झालेली ठाकरे-फडणवीस भेट महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, या भेटीवेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब आणि सचिन अहेर हे देखील उपस्थित होते.
