Explore

Search

April 5, 2025 1:04 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara Health News : सातारा जिल्ह्यात माता मृत्यू संख्येत घट

सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील गर्भवती मातांची नियमित तपासणी व योग्य उपचार पद्धती आरोग्य विभागाच्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे माता मृत्यू संख्येत घट होत आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याने डिसेंबर 2024 अखेर 9 मातांचा मृत्यू झाला असून हे प्रमाण अतिशय कमी आहे.

आरोग्य विभागाच्या वार्षिक अहवालानुसार माता मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याची आश्वासकता आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे सातत्यपूर्ण प्रयत्न अन् दुर्गम भागात कार्यरत आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविकांकडून गर्भवतींची घेण्यात येणारी काळजी, नऊ महिने योग्य उपचार, मातांची प्रसूती काळात पहिल्या महिन्यापासून घेण्यात येणारी काळजी, योग्य औषधोपचार पद्धती, प्रत्येक महिन्यात दोन शिबिरे घेऊन बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञांकडून गरोदर माता व बालकांची नियमित तपासणी आदी कारणांमुळे माता मृत्युदरात लक्षणीय घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रत्येक महिन्याच्या 9, 18 व 27 अशा तीन वेळेला सर्व गर्भवती मातांना एकत्र आणून एएनसी प्रोफाईल व गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या इतरही सर्व तपासण्या केल्या जातात. अडीअडचणी समजून घेऊन त्यानुसार सल्ला व मार्गदर्शन केले जाते. गरोदरपणातील स्वत:ची काळजी, आहार व आरोग्याबाबतचे काही गैरसमज, लसीकरण आणि गर्भवती मातांच्या स्वत:च्या काही अडचणी किंवा काही शारीरिक त्रास होत असतील तर मार्गदर्शन, अतिजोखमीच्या मातांची विशेष काळजी व मार्गदर्शन व त्यानुसार योग्य औषधोपचारही दिला जातो. गरोदर माता, रक्तवाढीच्या व कॅल्शियमच्या गोळ्या घेतात का, त्यांच्या काही इतर आरोग्याच्या अडचणी आहेत का, हे बघून त्यांना त्यानुसार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.

राज्य शासनाने सुरू केलेल्या जननी सुरक्षा योजनेमुळे प्रसूतीसाठी महिला रुग्णालयामध्ये येत आहेत. परिणामी योग्य वेळेत उपचार मिळून बाळ आणि बाळंतीण यांचे आरोग्य सुद़ृढ होण्यास मदत मिळत आहे. तसेच प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी जिल्ह्यात राबवली जात आहे. माता मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. – डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी

 

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy