कसुरी मेथी, जिला अनेक जण कस्तुरी मेथीदेखील म्हणतात. मात्र तिचा योग्य उच्चार कसुरी मेथी असाच आहे. पाकिस्तान येथे कसूर नावाचे एक ठिकाण आहे, तिथे उच्च दर्जाची मेथी बनते, वाळवली जाते आणि मोठ्या प्रमाणात विकली जाते. त्यामुळे तिथल्या नावावरून तिला ‘कसुरी मेथी’ म्हटले जाते. नावाची गोष्ट जितकी नाविन्यपूर्ण आहे, तेवढीच कसुरी मेथी खाण्याचे फायदे देखील तुमच्यासाठी नवीन असतील. मात्र, ते वाचून तुम्ही कसुरी मेथी (Benefits of Kasuri Methi) वापराचे प्रमाण वाढवाल हे नक्की!
कोणत्याही ग्रेव्ही असलेल्या भाजी मध्ये कसुरी मेथी टाकली की भाजीची लज्जत वाढते. हॉटेलमध्येही जवळपास सगळ्या भाज्यांमध्ये कसुरी मेथीचा वापर केला जातो. अनेक जण घरच्या घरी मेथी वाळवून प्रयोग करतात, पण त्याला कसुरी मेथीची चव येतेच असे नाही. त्यावर प्रक्रिया करून ती पॅकबंद केल्याने तिची चव आणि सुवास टिकून राहतो.
याबरोबरच कसुरी मेथी आरोग्यासाठीही अतिशय लाभदायी आहे हे तुम्हाला माहीत आहे का? विशेषतः महिलांसाठी तर ती संजीवनी आहे असेच म्हटले पाहिजे. कसुरी मेथीमुळे रजोनिवृत्तीच्या लक्षणांपासून अर्थात मेनोपॉजच्या काळात आराम मिळतो. त्यात फायटर इस्ट्रोजेन असते जे मेनोपॉज दरम्यान दरम्यान उद्भवणाऱ्या हार्मोनल असंतुलनाच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे अतिस्त्राव, स्वभावाचे असंतुलन आणि इतर हार्मोनल समस्या कमी होतात.
तसेच कसुरी मेथीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. गॅस , बद्धकोष्ठता आणि पोटासंबंधी विकार कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. यात अँटी-फ्लॅट्युलेंट गुणधर्म आहे, ज्यामुळे पोट स्वच्छ राहण्यास मदत होते.
कसुरी मेथीमध्ये hydroxyisoleucine नावाचा घडकी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मधुमेही रुग्णांना याचा फायदा होतो. यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो, कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
