Explore

Search

April 12, 2025 8:41 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Karad Crime News : तब्बल ७० लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार कराडात उघडकीस

राड : दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने सात जणांची तब्बल ७० लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार कऱ्हाडात उघडकीस आला आहे. यापूर्वीही अशी बरीच प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. त्यामध्ये पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल झालेत. मात्र, तरीही दामदुप्पटचा ‘भूलभुलैय्या’ कमी झालेला नाही. वेगवेगळी आमिषे दाखवून गुंतवणूकदारांना भुलवले जात असून त्यांची फसवणूक केली जात आहे.

जिल्ह्यात अनेक गुंतवणूकदार सध्या ‘मार्केट’वाल्यांच्या नादी लागले आहेत. जेवढी जास्त गुंतवणूक तेवढा जास्त फायदा, हे मार्केटवाल्यांचे साधे सरळ गणित असून त्याचेच गाजर दाखवून मार्केटवाल्यांनी अनेकांचे पैसे गुंतवून घेतले आहेत. चांगला परतावा मिळण्याच्या अपेक्षेने काही जणांनी स्वत:कडील पैसे गुंतवले आहेत, तर काही जणांनी शेजारी, पाहुणे, मेहुणे, मित्रांनाही पैसे गुंतवायला लावलेत. तसेच हातउसने पैसे घेऊन, कर्ज काढूनही काहींनी गुंतवणूक केली आहे.

मात्र, त्यापैकी अनेक गुंतवणूकदारांमागे सध्या भुंगे लागलेत. पाहुणे, मेहुणे सगळेच पैशाचा जाब गुंतवणूकदाराला विचारत आहेत. मात्र, जिथे पैसे गुंतवले त्यांनी हात वर केल्यामुळे उत्तरे काय द्यायची आणि पैसे कसे परत मिळवायचे, हा प्रश्न सध्या अनेक गुंतवणूकदारांना सतावतोय.

मार्केटवाल्यांचं काय असतं आमिष?

चांगला परतावा : अनेक जण गुंतवणूक करून घेताना गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवतात. दरमहा परतावा आणि मूळ रक्कम सुरक्षित, ही फसवी ऑफर दिली जाते.
आकर्षक व्याजदर : राष्ट्रीयीकृत, सहकारी बँका तसेच पतसंस्थाही ठेवींवर जास्तीत जास्त ८ टक्केपर्यंत वार्षिक व्याजदर देतात. मात्र, फसवणुकीच्या उद्देशाने पैसे घेणारे दरमहा ४ ते ५ म्हणजेच वार्षिक पंचवीस ते तीस टक्क्याने परतावा देण्याचे आमिष दाखवतात.
अल्पावधीत दामदुप्पट : गुंतवलेली रक्कम दुप्पट होण्यासाठी बँका, पतसंस्था किमान सात वर्षांचा कालावधी घेतात. मात्र, फसवणूक करणारे अगदी दोन ते चार वर्षांत दामदुप्पट देण्याचे ‘गाजर’ दाखवतात.
मूळ रक्कम सुरक्षित : गुंतवणूकदाराने जी रक्कम गुंतवली आहे, ती रक्कम सुरक्षित राहणार असल्याची खात्री देत त्या रकमेचा धनादेशही काही जण देतात. मात्र, प्रत्यक्षात तो धनादेश बँकेत वटत नाही, हे गुंतवणूकदाराला फसवणुकीनंतर लक्षात येते.

ठेवींवर कोण किती देतं व्याजदर

७ : राष्ट्रीयीकृत बँका
९ : सहकारी बँका
९.५ : पतसंस्था
१० : पतपेढी
१०.५ : क्रेडिट सोसायटी
(आकडे टक्केवारीमध्ये)

गुंतवणूक करताना घ्या काळजी

कष्ट करून आणि घाम गाळून कमावलेले पैसे असेच कुणाकडेही सोपवताना काळजी घ्यायला हवी. अल्पावधीत पैसे वाढवून मिळण्याचे आमिष आपली कष्टाची कमाई बुडीत घालवू शकते. चांगला परतावा, आकर्षक व्याज आणि कमी कालावधीत दामदुप्पट हे सध्या फसवणुकीचे फंडे बनले आहेत. त्यामुळे कोणत्याही खासगी क्षेत्रात पैसे गुंतवताना एकदा नव्हे तर दहा वेळा विचार करणे गरजेचे आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy