पुणे : अद्ययावत आरोग्य चिकित्सेबाबत आपली कटिबध्दता दर्शवत रूबी हॉल क्लिनिकने मोठ्या आतड्याचा कर्करोग असलेल्या (कोलान कॅन्सर) 74 वर्षीय पुरूष रूग्णावर रोबोटिक एक्सटेंड राईट हेमीकोलेक्टोमी ही प्रक्रिया यशस्वीरित्या केली. 28 नोव्हेंबर रोजी रूग्णालयात दाखल झालेल्या या रूग्णामध्ये थकवा,अस्वस्थता,वजन कमी होणे आणि भूक न लागणे ही लक्षणे होती. अल्ट्रासाऊंड (युएसजी),कोलोनोस्कोपी आणि सीटी स्कॅनसारख्या निदान चाचण्यांमधून मोठ्या आतड्याचा मध्यभागी कर्करोग असल्याचे निदान झाले.
रूग्णाचे वय आणि गुंतागुंत लक्षात घेता रूबी हॉल क्लिनिकच्या तज्ञ टीमने रोबोटिक एक्सटेंड राईट हेमीकोलेक्टोमी ही महाराष्ट्रातील सर्वात प्रगत तंत्रापैकी एक असलेली प्रक्रियेचा अवलंब करण्याचे ठरविले. रोबोटिक दृष्टीकोनामुळे शल्यचिकित्सकांना कमीत कमी छेद वापरून अचूकतेने शस्त्रक्रिया करता आली. रोबोटिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अचूकता साध्य झाली,पण त्याचबरोबर रूग्णाच्या बरे होण्याच्या प्रक्रियेमध्ये देखील लक्षणीय सुधारणा झाली.
मोठ्या आतड्यातील बाधित भागातील कर्करोगाची गाठ अचूकतेने रोबोटिक यंत्रणेद्वारे काढण्यात आली आणि ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. या प्रक्रियेमुळे भवतालच्या पेशींना संभाव्य इजेचा धोका टाळता आला.तसेच कमी रक्तस्त्रावामुळे शस्त्रक्रियेपश्चात रूग्णाची प्रगती चांगली झाली.शस्त्रक्रियेनंतर केवळ तीन दिवसात म्हणजे 1 डिसेंबर रोजी रूग्णाला घरी जाता आले. यावरून वयस्कर रूग्णांमधील कर्करोग चिकित्सेमध्ये परिवर्तन घडविण्याचे रोबोटिक शस्त्रक्रियेचे सामर्थ्य दिसून येते.
गॅस्ट्रोइंस्टेटिनल सर्जन डॉ.विद्याचंद्र गांधी म्हणाले की,यातून आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाचे परिवर्तनीय सामर्थ्य दिसून येते. कमीत कमी छेद वापरून व अचूकता साधून रूग्णांना चांगले परिणाम मिळणे शक्य होते.यासारख्या अभिनवतेमुळे विशेष करून पारंपरिक शस्त्रक्रियेमधील उच्च जोखीम असलेल्या वयस्कर रूग्णांसाठी अद्ययावत आरोग्यसेवा प्रदान करता येते.
पुण्यातील आघाडीच्या सर्जिकल आँकोलॉजिस्टमधील एक असलेल्या व कमीत कमी छेद असलेल्या शस्त्रक्रिया आणि रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ.सुजय हेगडे म्हणाले की,कमीत कमी छेद असलेली प्रक्रिया आणि रोबोटिक शस्त्रक्रिया ही कर्करोग चिकित्सेमधील आता मापदंड आहे.
यामध्ये मिळणारे चांगले परिणाम,दैनंदिन कामकाजामध्ये पुन्हा रूजू होणे आणि पुढील उपचारामध्ये चांगला प्रतिसाद याबाबत असलेल्या सुलभतेमुळे रूग्णसेवेमध्ये परिवर्तन घडत आहे.पुढील काळात या प्रकारचे अद्ययावत तंत्रज्ञान अधिक लोकांपर्यंत पोहचेल आणि याच्या वाढत्या किफायतशीरपणामुळे हे सर्वसामान्य प्रमाण ठरेल.
रूबी हॉल क्लिनिकचे चीफ कार्डिओलॉजिस्ट,अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.परवेझ ग्रांट म्हणाले की, अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञान अवलंबिण्यामध्ये रूबी हॉल क्लिनिक हे नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे.ही यशस्वी प्रक्रिया आमच्या रूग्णांना सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करण्याची आमची कटिबध्दता दर्शविते.
रोबोटिक शस्त्रक्रियेसारख्या आधुनिक प्रक्रियांच्या माध्यमातून अद्ययावत आरोग्य सेवा प्रदान करण्याचा आम्हाला अभिमान आहे.ही पथदर्शक प्रक्रिया कोलान कॅन्सरच्या उपचारामध्ये नवीन मापदंड प्रस्थापित करण्याबरोबरच जागतिक दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करण्याची रूबी हॉलची समर्पितता दर्शविते.
