पक्ष पुनर्बांधणीचे कार्य तत्काळ सुरू करणार
बेळगाव (कर्नाटक) : येथे आयोजित पक्ष कार्यकारिणीच्या ऐतिहासिक बैठकीत काँग्रेसने गुरुवारी १३ महिन्याचे राजकीय अभियान जाहीर केले. यात पदयात्रांसह विविध मुद्द्यांवर भर देण्याचे निश्चित करण्यात आले. प्रामुख्याने संविधानावर होत असलेल्या कथित हल्ल्यासह महागाई व भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही या राजकीय अभियानात भर दिला जाईल.
याशिवाय काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक सुधारणांसह पक्षाच्या पुनर्बांधणीचे कार्य तत्काळ सुरू करण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत येथे घेण्यात आला. वर्षभर देशात ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ अभियान चालवण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले. या ऐतिहासिक बैठकीला पक्षाध्यक्ष मल्लिाकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते व माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस जयराम रमेश,
के. सी. वेणुगोपाल आदी नेते उपस्थित हाेते.
काय आहेत दोन प्रस्ताव…
गुरुवारी बैठकीनंतर पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश, माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बैठकीबाबत माहिती दिली. बैठकीत दोन प्रस्ताव पारित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यातील एक महात्मा गांधी यांच्यासंबंधी तर दुसरा प्रस्ताव राजकीय आहे.
आगामी २०२५ हे वर्ष पक्षासाठी मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदलाचे वर्ष असल्याचे सांगून या काळात मोठे बदल केले जातील, असे त्यांनी नमूद केले.
आता सुरू होणारे ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ अभियान एक वर्ष चालेल, असे ते म्हणाले. एप्रिलमध्ये महात्मा गांधी यांचे जन्मस्थळ असलेल्या पोरबंदर (गुजरात) येथे काँग्रेसचे अधिवेशन आयोजित करण्यात येणार असल्याचे वेणुगोपाल यांनी नमूद केले. या अभियानात पदयात्रा होतील. जिल्हा व राज्य पातळीवर जाहीर सभांचे आयोजन केले जाईल.
दिल्लीतील सत्ताधाऱ्यांकडून महात्मा गांधीजींची विचारधारा धोक्यात : सोनिया गांधी
दिल्लीतील सत्ताधारी आणि त्यांच्याशी संबंधित संस्थाकडून महात्मा गांधीजींची विचारधारा धोक्यात आली आहे, असा आरोप करतानाच महात्मा गांधींच्या वारशाचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आम्ही स्वतःला समर्पित करतो. तो आमच्या प्रेरणेचा मूळ स्रोत होता आणि राहील, असे काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
बाबासाहेबांच्या सन्मानासाठी अखेरपर्यंत लढू; काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी व्यक्त केला निर्धार
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अवमान केला आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्यच करायला तयार नाहीत. आम्ही डॉ. आंबेडकरांचा अवमान कदापिही सहन करू शकत नाही. डॉ. आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांची विचारधारा जपण्यासाठी, तिच्या सन्मानासाठी या सरकारविरुद्ध अखेरच्या श्वासापर्यंत लढू, असा निर्धार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केला.
