कराड : पार्ट्या व चैन करण्यासाठी दुचाकी चोरणार्या मलकापूर परिसरातील एका अल्पवयीन संशयित चोरट्यास शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाच्या पोलसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2 लाख 50 हजारांच्या दहा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्या दुचाकी शहर व परिसरातून चोरल्याची कबुली त्याने दिली आहे. त्याच्या टोळीत अन्य तिघांचा समावेश आहे. त्याचाही डीबी पथकासह अन्य दोन पथकांकडून तपास सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले की, मागील काही महीन्यात शहर परिसरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तात्काळ गुन्हयांचा छडा लावण्याचे आदेश सदिले होते. त्याबाबत पोलिस अधीक्षक समिर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाचे सहायक पोलिस निरिक्षक अशोक भापकर व त्यांच्या पथकाने बातमीदारांतर्फे सापळा रचला. त्यात तपास करताना काही ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयितांच्या संशायास्पद हालचाली आढळल्या. काहीजण प्रत्यक्ष दुचाकी नेतानाही त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार बातमीदारार्फे त्या संशयितांची माहिती काढून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दुचाकी चोरीचा प्रकार उघडकीस आला. मात्र संबधित संशयित मलकापूर परिसरातील असून तो अल्पवयीन आहे. त्याच्यासोबत आणखी तिघांचाही समावेश आहे. त्यांचा शोध सुरू आहे.
त्याबाबत डीबीच्या पथकाने सापळा रचला आहे. त्यानुसार काही संशयितांकडे चौकशी सुरू आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन संशयीताकडून दोन लाख 50 हजारांच्या 10 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यातील चार दुचाकी शहर व परिसरातील असून दुचाकींची चौकशी सुरू आहे. त्याने अन्य ठिकाणी गुन्हे केले आहेत का ? याचीही चौकशी सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजु ताशिलदार यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक भापकर, फौजदार आंदेलवार, हवालदार अनिल स्वामी, धीरज कोरडे, अमोल देशमुख, आनंदा जाधव, मोहसिन मोमीन, दिग्विजय सांडगे, हर्षल सुखदेव, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.
