खटाव : सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे आता मागणारे आणि देणारेही आपलेच असल्याने जिल्ह्याचा विकास वेगाने होईल. समन्वयाने काम करून आम्ही सर्व विभागांची जिल्ह्यातील विकासकामे मार्गी लावणार आहोत. पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराजांच्या भक्तांच्या सुविधांसाठी बांधकाम विभागाकडून लागेल तितका निधी देण्यात येईल. पुसेगावसाठी बाह्य वळण रस्त्याचे काम मंजूर करुन पूर्ण करु पण त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
श्री सेवागिरी महाराजांच्या 77 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कृषी, पशु-पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कृष्णाखोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष महेश शिंदे, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे, डॉ. प्रिया शिंदे, चेअरमन डॉ. सुरेश जाधव विश्वस्त रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, मानाजी घाडगे, किरण बर्गे, सरपंच घनश्याम मसणे, उपसरपंच विशाल जाधव आणि ट्रस्टचे माजी पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, गेली अनेक वर्षे मी सेवागिरी महाराजांच्या रथपूजनाला हजेरी लावतो. महाराजांच्या दर्शनाने उर्जा मिळते. पुसेगाव आणि देवस्थान ट्रस्टसाठी आजपर्यंत शक्य ती सर्व मदत करत आलो आहे. भक्त निवासाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. देवस्थान ट्रस्टच्या पब्लिक स्कूल येथील जागेचा प्रश्नही अंतिम टप्प्यात आहे. लवकरच तो प्रश्नही मार्गी लावला जाईल. उरमोडी, जिहे-कठापूर योजनांचे पाणी आम्ही सर्वांनी प्रयत्न करुन आणले आहे. त्यामुळे आपल्या भागाचा पाणीप्रश्न मार्गी लागत आहे. सोळशीचे धरण होण्यासाठी आमचे निकराचे प्रयत्न सुरु आहेत. चारमाही असलेली जिहे-कठापूर योजना आठमाही होण्यासाठी आमच्या हालचाली सुरु आहेत. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टला तिर्थक्षेत्र अ वर्ग दर्जा देण्याबाबतही माहिती घेऊन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ना. महेश शिंदे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा पुसेगावात भरते. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून आदर्शवत काम करत आहे. यात्रेतील कोट्यवधींची उलाढाल ग्रामीण अर्थकारणाला उभारी देण्याचे काम करते. आरोग्यदायी यात्रा म्हणून पुसेगावची यात्रा नावारुपाला आली आहे. पर्यटन विकासामधून पुसेगावसाठी निधी आणण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
प्रास्तविक करताना चेअरमन डॉ. सुरेश जाधव म्हणाले, यात्रा कालावधीत आयोजित बैलगाडी शर्यती, कुस्त्या, क्रिकेट, व्हॉलीबॉल स्पर्धांसह सर्वच कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. देवस्थान ट्रस्टकडून शेतकर्यांसाठी तसेच शिक्षण, जलसंधारणाची कामे केली जात आहेत. सर्व निधीचा विनियोग भक्तांच्या सोयीसुविधांवर केला जातो. चार मंत्रीपदे मिळाल्याने जिल्ह्याला सोन्याचे दिवस येणार आहेत. पुसेगावच्या मुख्य रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून देवस्थानला अ वर्ग दर्जा देण्याची मागणी त्यांनी केली.
सोळशी धरणासाठी प्रयत्नशील : ना. गोरे
ना. जयकुमार गोरे म्हणाले, सेवागिरी देवस्थानच्या माध्यमातून भरवण्यात येणार्या कृषी प्रदर्शनामुळे शेतकर्यांना अत्याधुनिक कृषी औजारांची माहिती होणार आहे. तसेच या प्रदर्शनामुळे प्रचंड आर्थिक उलाढाल वाढणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना बारमाही पाणी मिळाले पाहिजे. राज्य शासनाच्या माध्यमातून दुष्काळी तालुके पाच वर्षांत दुष्काळमुक्त करणार आहे. सोळशी धरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या धरणाला तत्वत: मान्यता मिळाली असल्याचेही ना. गोरे म्हणाले.
