Explore

Search

April 8, 2025 9:35 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

फलटणचे पाणी कुठेही वळवणार नाही; पुण्यातील बैठकीत जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे स्पष्टीकरण .!

सातारा प्रतिनिधी । पुणे येथे नीरा उजवा कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकतीच पार पडली. या बैठकीत फलटण तालुक्याच्या हक्काच्या पाण्याबाबतचा प्रस्ताव चर्चेत होता, त्यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फलटण तालुक्याच्या हक्काचे एक थेंबही पाणी इतरत्र कोणत्याही तालुक्याला देण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले.पुणे येथील कौन्सिल हाॅल मध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत खडकवासला, पवना, चासकमान भीमाआसखेड, नीरा डावा व उजवा कालवा, माजलगाव मांजरा या धरणाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. आवर्तनाच्या नियोजनाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत फलटण तालुक्याच्या शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पाण्याची मागणी केली होती. विधान परिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्याच्या पाण्याची वाटणी इतरत्र होऊ नये म्हणून आग्रही मागणी केली. फलटण तालुक्याच्या जमिनी नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात असल्याने त्यांच्या हक्काचे पाणी इतरत्र देण्याचे काही कारण नसल्याचे रामराजे यांनी म्हटले.

रामराजे यांनी आपली बाजू मांडल्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फलटण तालुक्याच्या हक्काचे पाणी इतरत्र कोणत्याही तालुक्याला देण्याचा प्रस्ताव शासनाकडे दाखल नाही. कालवा सल्लागार समितीला पाणी वळवण्याचा अधिकार नाही. फलटण तालुक्याच्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळेल याची शाश्वती देण्यात आली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले. जलसंपदा मंत्र्यांच्या या निर्णयामुळे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचा परिणाम स्थानिक शेती आणि जलसंपत्ती व्यवस्थापनावर होणार आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy