सातारा प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर काही धक्कादायक फोटो समोर आले आहेत. या फोटोंमुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर अखेर आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारत तो पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. तसेच, या सर्व घडामोडींमध्ये धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर पोस्ट करत राजीनाम्यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.
