सातारा प्रतिनिधी : जिल्ह्यात मार्च महिना सुरू झाल्यापासून उन्हाचा पारा वाढत चालला आहे. पूर्व भागात ३८ अंशावर कमाल तापमान गेले आहे. तर सातारा शहरात ३७.५ अंशापर्यंत नोंद झालेली आहे. यामुळे उन्हाची तीव्रता वाढली आहे. तर दुसरीकडे किमान आणि कमाल तापमानात २० अंशाचा फरक असल्याने पहाटे थंड हवेची झुळूक ही आहे.जिल्ह्यात दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी अशी थंडी राहते. पण, यावर्षी हिवाळ्यात काहीच दिवसच पारा खालावला होता. त्यातच थंडीचे प्रमाणही कमी राहिले. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या मध्यापासून कमाल तापमानात वाढ होत गेली. परिणामी थंडी गायब झाली होती. तर फेब्रुवारी महिन्यापासून हळूहळू उन्हात वाढ होत गेली. कमाल तापमान ३५ अंशावर गेले. यामुळे यंदा उन्हाची तीव्र लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. हा अंदाज बरोबर ठरताना दिसून येत आहे. कारण, मागील १५ दिवसांपासून पारा सतत वाढत गेला आहे.
सातारा शहरातील पारा सतत ३५ अंशावर आहे. सोमवारी तर ३७.५ अंशाची नोंद झाली. हे या वर्षातील आतापर्यंतचे उच्चांकी कमाल तापमान ठरले होते. तर मंगळवारी पारा थोडासा खाली आला. पण, ३५ ते ३६ अंशावर कायम आहे. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण हे दुष्काळी तालुके. या तालुक्यातील तापमान साताऱ्यापेक्षा अधिक असते. सध्या या तालुक्यातील पारा ३८ अंशावर गेला आहे. त्यामुळे पुढील दोन महिने आणखी तापदायक ठरणार आहेत. तसेच सध्याच उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतीच्या कामावर परिणाम झालेला आहे. दुपारच्या सुमारास तर ग्रामीण भागातील रस्तेही ओस पडलेले दिसत आहेत.
