Explore

Search

April 5, 2025 1:01 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यभर ‘विशेष ग्रामसभा’ – महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे

सातारा प्रतिनिधी : महिला सक्षमीकरणाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून, बालविवाह होऊ नये यासाठी लोकचळवळ राबविणे महत्वाचे आहे. या अनुषंगाने महिला दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्राम सभा आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी व्यापक लोकचळवळ उभी रहावी, महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रभावी धोरणे गावपातळीवर अंमलात यावीत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबविल्या जाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या विशेष ग्रामसभेमध्ये स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि नागरिकांनी महिलांच्या उन्नतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले आहे.

महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि मुलभूत हक्कांसाठी लढा देण्याची महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आजच्या काळातही महिलांसाठी न्याय आणि सुरक्षा देणे तसेच प्रत्येक गाव आणि खेड्यापर्यंत महिला व बालकांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून बालविवाह, जाचक विधवा प्रथा, अन्यायकारक अंधश्रद्धा यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तसेच मुलींच्या जन्मदर वाढीसाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy