प्रतिनिधी, सातारा : राज्यातील गरिबांसाठी सणासुदीच्या दिवसात आधार असणारी आनंदाचा शिधा योजना अखेर बंद करण्यात आली आहे. राज्यातील निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने काही महत्त्वाच्या योजना लागू केल्या होत्या. त्यात आनंदाचा शिधा या योजनेचाही समावेश होता. या योजनेचा फायदा राज्यातील जवळपास 1 कोटी 63 लाख लाभार्थींना झाला होता. आता ही योजना बंद करण्याचा निर्णय झाला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आनंदाची शिधा, तीर्थाटन योजना अशा काही योजना सरकारकडून बंद करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यातील आनंदाची शिधा योजना आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील महायुती सरकारकडून अनेक योजनांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. सोमवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अनेक योजनांना निधीचं वाटप करण्यात आलं आहे. त्यामध्ये आनंदाचा शिधा आणि इतर काही योजनांच्या निधीबाबत कुठेही भाष्य करण्यात आले नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा ही योजना लागू करण्यात आली होती. राज्यातील विविध सणाच्या निमित्ताने या योजनेत लाभार्थींना अवघ्या 100 रुपयांत पाच वस्तू घरपोच मिळत होत्या. त्यामुळे किमान काही अंशी दिलासा गरिबांना मिळत होता. आता मात्र ही योजना बंद करण्यात आली आहे.
