राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपामध्ये जाणार, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपामध्ये जाणार, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यावेळी ही चर्चा पुन्हा सुरु झाली. आपण मतदारसंघातील कामांसाठी भेट घेतल्याचं स्पष्टीकरण पाटील यांनी दिलं होतं. पण, अजूनही याबाबतची चर्चा संपलेली नाही. त्यातच जयंत पाटील यांनी माझं काही खरं नाही, असं सांगितल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. अखेर जयंत पाटील यांनी स्वत:च याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले जयंत पाटील ?
शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांनी आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानावर मोर्चा आज (बुधवार, 12 मार्च 2025) काढण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या सभेत जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेस आमदार सतेज पाटील देखील उपस्थित होते. त्यावेळी जयंत पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी एकजुटीने संघर्ष करण्याचं आवाहन केलं.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, ‘आमचा दारुण पराभव झाला आहे. आम्ही बोलायचं हळहळू कमी झालोय. कारण, बोलून लोकांना काही समजत नाही. गंभीर प्रश्नांपेक्षा इतर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी प्रसार माध्यमांद्वारे, सोशल मीडियाद्वारे लोकांच्या मनावर बिंबवले जात आहेत. पण, तुमच्या अंगावरुन शक्तीपीठ जाईल. राजू शेट्टी यांनी एकदा झेंडा घेतला तर ते सोडत नाहीत. माझ्यावर विश्वास ठेवू नका. माझं काही खरं नाही.’
