“मी सह्याद्री कारखान्याचा सभासद नसलो तरी या कारखान्यात सत्तेचं केंद्रीकरण झालं आहे. कारखान्यात सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे होती, मात्र ती मिळाली नाही. कारखान्याच्या सभासदांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे,”
सातारा प्रतिनिधी : दिवंगत काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची ११२ व्या जयंती निमित्त साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील समाधीस्थळी येऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर निशाणा साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचं वर्चस्व असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीसाठी मतदान ५ एप्रिलला पार पडणार आहे तर निकाल ६ एप्रिलला जाहीर होईल. माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासमोर विरोधकांनी ताकदीनं निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे. यामध्ये भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील लक्ष घालणार असल्याचा इशारा देखील यांनी खा. उदयनराजे भोसले यांनी दिला.
सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी सत्तांतर होईल असा दावा केला आहे. कारखान्याचे सभासद कुणाला कारखान्याची सत्ता देतात ? मतदार कारखाना कुणाच्या हाती सोपवतील? याचा निर्णय ५ एप्रिलला करतील. तर, ५ एप्रिलला निकाल जाहीर होईल.
