अमरावती (१४) ;राज्यात होळी आणि धुळवडीचा सण साजरा केला जातो आहे. मात्र, बच्चू कडू यांनी अनोख्या पद्धतीने धुळवड साजरी केली आहे. अमरावती जिल्ह्यातील कुरळपूर्णा येथे बच्चू कडूंनी रस्ते रंगवत हा सण साजरा केला आहे. तसेच त्यांनी याद्वारे सरकारकडे विविध मागण्याही केल्या आहेत.
बच्चू कडू म्हणाले, “रंगपंचमी हा उत्सव आहे. पण त्याला आम्ही मागणीचं स्वरुप दिलं आहे. सरकारनं रंगाचं राजकारण करून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम केलं आहे. या सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र, कर्जमाफी दिलेली नाही. दुसरीकडे शेतमालाला भावही मिळालेला नाही. अशाप्रकारे शेतकऱ्यांवर दुहेरी अन्याय करण्याचं काम सरकारनं केलं आहे.”
“बटेंगे तो कटेंगेच्या घोषणेत शेतकरी पूर्णपणे दुर्लक्षित झाला आहे. आज शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि तुरीला भाव नाही. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. पण या अर्थसंकल्पात त्याचा साधा उल्लेखही केलेला नाही. दिव्यांगांचे चार महिन्यापासून पैसे अद्यापही मिळालेले नाही, खरं तर सरकार यासगळ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते आहे”, असा आरोपही त्यांनी केला.
“या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी यावर्षी आम्ही पाच किलोमीटर रस्ता रंगून शासनाला एक प्रकारचा इशारा दिला आहे. सरकारनं आमच्या अंगावर खुनाचा रंग चढवला आहे. लाल रंग त्यांनी आमच्या कपाळाला लावला आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांची ही अवस्था आहे. आज शेतकरी आणि मजुरांचा रंग फिक्का पडला आहे. त्यांच्या आयुष्यातला रंग उडाला आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली..
