काशिनाथांचं चांगभलं चा गजर करत बगाड यात्रेची सुरूवात : हजारो भाविकांची उपस्थिती
बावधन येथील काशिनाथाच्या बागड यात्रेचा यावर्षीचा बगाड्या चा मान अजित ननावरे यांना…
सातारा प्रतिनिधी ; सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकदृष्ट्या एक महत्त्वाचं गाव. सोमजाईचा आणि वैराटगडाच्या डोंगर खोऱ्यात हे गाव वसलेलं आहे. गावात उत्तरेकडून वाहत येत असलेले वैराट ओढ्याच्या काठी नाथपंथीयांच्या इतिहासावरून सुमारे नवव्या शतकाच्या पूर्वार्धापासून नाथपंथी वैरागी लोकांनी सांप्रदायाचा प्रसार, प्रचार करण्यासाठी येथे येऊन वस्ती केली असावी.
गावात सुमारे नवव्या शतकापासून नाथपंथीय धनगरांची वस्ती आहे. सोळाव्या शतकापासून भिंताडे, भोसले, पिसाळ, कदम आणि दाभाडे तसंच बारा बलुतेदार, अलुतेदार सर्व जाती-धर्माच्या लोकांची वस्ती बावधन भागात वाढत गेली, अशी शिवकालीन इतिहासावरून सांगता येईल. बावधन हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आहे. “काशिनाथाचे चांगभलं”च्या आरोळीच्या निनादात सर्व कार्यक्रम साजरे होतात. आज बावधन गावात विविध समाजाची मंडळी गुण्यागोविंदाने राहतात. सार्वजनिक आणि धार्मिक कार्यात सर्व लोक एकत्र समान भूमिकेतून सामील होतात. हा बगाडाचा उत्सव साजरा करत असताना बगाड उत्सवासाठी सर्व जबाबदारी सर्व जातीधर्मामध्ये विभागली आहे. सर्व मंडळी न चुकता आपली जबाबदारी पार पडत आहेत. हे या यात्रेच्या वर्षानुवर्ष सुंदर व्यवस्थापनाचे एक मूळ कारण आहे.
महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांना बागड यात्रेला हजेरी लावली जाते आणि दरवर्षी ती सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथे भरते. महाराष्ट्रातील पारंपारिक हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील चंद्राच्या अस्ताच्या पाचव्या दिवशी किंवा फाल्गुन कृष्ण पक्ष पंचमीला भैरवनाथ बागड यात्रा साजरी केली जाते.
