लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, पण या योजनेत दुरुस्ती केली जाईल : अजित पवार
मुंबई :- गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विजयात गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत सध्या कमालीची अनिश्चितता निर्माण झालेली दिसत आहे. एकीकडे नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामधून या योजनेसाठी आर्थिक तरतूद करताना वित्तमंत्री अजित पवार यांनी हात आखडता घेतला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपयांऐवजी १५०० रुपयांवरच समाधान मानावे लागणार असल्याचं स्पष्ट झालंय. तर दुसरीकडे सरकार ही योजना लवकरच गुंडाळेल, असे दावे विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेतून लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, पण या योजनेत दुरुस्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
विधानसभेत लाडकी बहीण योजनेवर बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, लाडक्या बहिणींना आतापर्यंत दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत. आम्ही कुठल्याही महिला भगिनीला दिलेले पैसे परत घेणार नाही. ही योजना आम्ही चालू ठेवणार आहोत. तसेच या योजनेला जो निधी लागणार आहे, तो देणार आहोत. मात्र ही योजना गरीब घटकातील महिलांसाठी आहे, हे मी या सभागृहाच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो.
अजित पवार पुढे म्हणाले की, कधी कधी योजना येते. मात्र त्यातील काही गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण दुरुस्ती करतो. आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती करणार आहोत. ही योजना बंद करणार नाही. त्याच्यामध्ये कुठल्याही गरीब महिलेवर अन्याय करणार नाही. ज्यांना गरज आहे. त्यांना १०० टक्के मदत देणारच. त्यामध्ये आम्ही तसूभरही कमी पडणार नाही, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
