पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर या धर्मादाय रुग्णालयाने पैसे न भरल्याने एका गर्भवती महिलेवर उपचारास नकार दिला. ज्यानंतर दोन जुळ्या बाळांना जन्म दिलेल्या महिलेला जीव गमवावा लागला. पैसे न भरल्याने रुग्णालय प्रशासनाने या महिलेस परत पाठवले आणि पुढील रुग्णालयात लवकर उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आज मंगेशकर रुग्णालयासमोर आंदोलने केली जात आहेत.
प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या रूग्णालयाच्या समोर आंदोलन केलं जात आहे.
